कणकवलीत १४ मे रोजी परिवर्तन अभिवादन दिन

आनंदराज आंबेडकर, दीक्षांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थितीत सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा साजरा होणार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ मे १९३८ मध्ये कणकवली तालुक्याला पदस्पर्श झाला होता. डॉ. आंबेडकर यांच्या परिवर्तन विचारांना उजाळा देण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १४ मे हा दिवस सिंपन प्रतिष्ठान परिवर्तन दिन म्हणून साजरा करीत आहे. यंदाही हा दिवस साजरा केला जाणार आहे. यानिमित्त बुधवार १४ मे रोजी सकाळी १०.३० वा. येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सभागृहात परिवर्तन अभिवादन दिन व सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी सिंपन प्रतिष्ठान, मुंबईचे अध्यक्ष अनिल तांबे हे असणार आहेत. प्रमुख पाहुणे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे तर विषेश अतिथी म्हणून तहसीलदार दीक्षांत देशपांडे हे उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याला जानवली सरपंच अजित पवार, सुप्रसिद्ध चित्रकार नामानंद मोडक, वास्तूविशारद प्रथमेश पडवळ, सामाजिक कार्यकर्ते वाय. डी. सावंत, अशोक कदम, संदीप कदम, जयप्रकाश कदम यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत. स्मृतीशेष प्रा. रमाकांत यादव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा सिंपन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक उत्तम कांबळे यांना प्रदान केला जाणार आहे. स्मृतीशेष प्रा. विजय जामसंडेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सिंपन विजयी भव युवा पुरस्कार निवेदक, अभिनेता, व्याख्याता निलेश पवार यांना प्रदान केला जाणार आहे. सिंपन अमृत सन्मान पुरस्कार सेवानिवृत्त शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते भास्कर तांबे, सामाजिक कार्यकर्ते नाना डामरेकर, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विनायक मिठबावकर, तसेच कवी, गायक, शाहीर जनीकुमार कांबळे यांना प्रदान करण्यात येणार आहे.त्याचबरोबर सिंपन सन्मान पुरस्कार डॉ. सतीश पवार व प्रा. डॉ. सुयश डिकवलकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. परिवर्तन दिन व पुरस्कार वितरण सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सिंपन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. संदीप कदम, सरचिटणीस बाळकृष्ण जाधव, खजिनदार दत्ता पवार, उपाध्यक्ष सत्यविजय तांबे, लक्ष्मण चौकेकर, गोपाळ जाधव यांनी केले आहे. या सोहळ्याचा अधिक माहितीसाठी चितरंजन कदम(९८३३२३५६२४) प्रा. वर्षा कदम (९८९२६६०२५०) वैशाली यादव ( ९८६७१७२८३४) अजित धामापूरकर (९८६९०१७५३०) यांच्याकडे संपर्क साधावा.