वनराई बंधारा फूटल्याची बातमी दाबण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चौथ्या स्तंभावर दबाव

माजी आमदार वैभव नाईक यांनी केला निषेध
सिंधुदुर्गात लोकशाही दडपण्याचे अधिकाऱ्यांकडून काम
पालकमंत्री नितेश राणे यांनी दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर - आंबेली येथे श्रमदानातून बांधलेला वनराई बंधारा अवघ्या तासाभरात फुटून वाहून गेला आहे.शनिवारी याबाबतची बातमी दैनिक सागर वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली असून वाहून गेलेल्या बंधाऱ्याची बातमी इतर वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दबाव टाकून संबंधित पत्रकारांना फोनाफोनी करत आहेत.आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा असणाऱ्या पत्रकारितेवर दबाव टाकण्याचा प्रकार पूर्णतः चुकीचा आहे. त्याचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध करतो असे कुडाळ मालवणचे माजी आमदार, जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी सांगितले आहे.
वैभव नाईक पुढे म्हणाले, सध्या देशात आणि राज्यातील लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून नागरिक त्यांच्याकडे आदराने पाहतात. जिल्हा प्रशासनाने गाजावाजा करून जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचे काम केले पत्रकारांनी त्याच्या बातम्या प्रसारित केल्या. मात्र वाहून गेलेल्या बंधाऱ्याची बातमी प्रसारित होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हे पत्रकारांची गळचेपी करीत असून लोकशाही दडपण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. मात्र पत्रकारांनी अशा दबावाला भीक घालू नये. आज जे अधिकारी आहेत ते उद्या बदलतील त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या चुका दाखवण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजे. आम्ही देखील चुकत असलो तरी ते दाखवून दिले पाहिजे. आम्ही सत्तेत होतो तेव्हा आमच्या चुका पत्रकारांनी दाखवून दिल्या होत्या. त्यावेळी आम्ही कोणतीही हरकत न घेता उलट आमच्या कामात आम्ही सुधारणा केली होती. असे माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगत पत्रकारांच्या होणाऱ्या गळचेपीचा निषेध व्यक्त केला.






