आंब्रड येथे २२ ऑक्टोबरला कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबिर

बालकांचे समुपदेशन, आरोग्य तपासणी आणि शासकीय योजनांची मिळणार माहिती
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग, तालुका विधी सेवा समिती, कुडाळ, तालुका वकील बार असोसिएशन, कुडाळ आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी आंब्रड येथे कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. भगवती देवी माध्यमिक विद्यालय, आंब्रड येथे सकाळी ९ वाजता हे शिबिर होणार आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्गचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कायदेविषयक जनजागृती, बालकांचे समुपदेशन, आरोग्य तपासणी तसेच आरोग्यविषयक विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
या शिबिराला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदळ्ळी, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश एन. ए. बकरे, कुडाळ बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. जी. टी. पडते, कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील, उमेश गाळवणकर, डॉ. प्रत्युश रं. बिस्वाल, महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथील डॉ. सुशांता समीर कुलकर्णी तसेच कुडाळ तालुका बार असोसिएशनचे ज्येष्ठ विधिज्ञ उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन मिळावे, बालकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे समुपदेशन व्हावे आणि आरोग्यविषयक सुविधांसह शासकीय योजनांची माहिती मिळावी, हा या शिबिराचा उद्देश आहे. परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदळ्ळी यांनी केले आहे.






