मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेचा परवाना निलंबित करण्याबाबत नियमानुसार कारवाई करणार

मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांचे लेखी आश्वासन
स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांच्या तक्रारीची दखल
मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेतील कथित सोनेतारण गैरव्यवहार आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाची मालवण नगरपरिषदेने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित संस्थेच्या व्यवसाय परवान्याची पडताळणी करून चौकशीअंती नियमांनुसार परवाना निलंबित करण्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी स्वीकृत नगरसेवक रविकिरण चिंतामणी तोरसकर यांना दिले आहे.
मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेत ग्राहकांच्या सोनेतारण व्यवहारांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक १५४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुमारे नऊ किलो सोने या प्रकरणात अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे स्थानिक मच्छीमार महिला ग्राहकांसह अन्य नागरिकांच्या आर्थिक हिताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी २१ सप्टेंबर २०२६ रोजी मालवण नगरपरिषदेकडे लेखी तक्रार दाखल केली होती. संबंधित वित्तीय संस्थेच्या व्यवसाय परवान्याची तपासणी करून तो निलंबित अथवा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने तातडीने पावले उचलावीत, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
या तक्रारीला उत्तर देताना मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी पत्राद्वारे संबंधित संस्थेविरुद्ध दाखल झालेला फौजदारी गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे नमूद केले आहे. नगरपरिषदेने दिलेल्या व्यवसाय परवान्याच्या अटी व शर्ती, लागू कायदेशीर तरतुदी तसेच पोलीस यंत्रणा आणि संबंधित प्राधिकरणांकडून प्राप्त होणाऱ्या अधिकृत अहवालांच्या आधारे या प्रकरणाची सखोल छाननी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
चौकशीमध्ये संबंधित संस्थेने परवान्याच्या अटींचे किंवा कायद्याचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांच्या अधिकारात व्यवसाय परवाना निलंबित किंवा रद्द करण्याबाबत आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांचे आणि सार्वजनिक हिताचे रक्षण करणे ही नगरपरिषदेची प्राथमिकता असल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी लेखी पत्रात स्पष्ट केले आहे.
१२० मच्छीमार महिलांच्या लढ्याला बळ
या प्रकरणात सुमारे १२० मच्छीमार महिला आणि इतर ग्राहकांचे आर्थिक हित बाधित झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यांच्या न्यायासाठी स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या प्रकरणाला प्रशासकीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे. नगरपरिषदेच्या लेखी आश्वासनामुळे संबंधित ग्राहकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी सोने तारण फसवणूक तक्रार निवारण मंच, मालवण यांच्याकडूनही पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. आता नगरपरिषदेकडून होणारी चौकशी आणि त्यानंतरची कायदेशीर कारवाई याकडे संबंधित ग्राहकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.






