कवठीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

२५ रक्तदात्यांचे योगदान!

जिल्ह्यातील रक्तटंचाई दूर करण्यासाठी पुढाकार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये जाणवत असलेली रक्ताची टंचाई लक्षात घेऊन कवठी येथील श्री देवी सातेरी महादेवादी देवस्थान सल्लागार उपसमितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या सभागृहात झालेल्या या शिबिरात २५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन नेरुर मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन कवटकर, महादेव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मंगेश बांदेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादा करलकर, एकनाथ बांदेकर, अनंत खोबरेकर, माजी सरपंच अमृता पारसेकर, देवस्थान समितीचे सचिव रुपेश खडपकर यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

देवस्थान समितीचा उपक्रम कौतुकास्पद!

धार्मिक व सांस्कृतिक कार्यासोबतच समाजाच्या गरजा ओळखून रक्तदानासारखा जीवनदायी उपक्रम राबविणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे रुपेश पावसकर यांनी सांगितले. रक्ताच्या टंचाईच्या काळात अशा उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
शिबिरात तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला, तर काही महिलांनीही रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदात्यांना देवस्थान समितीच्या वतीने प्रमाणपत्रे व सकस आहार देण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढीच्या डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञांच्या पथकाने रक्तसंकलनासाठी सहकार्य केले. सामाजिक जाणिवेतून आयोजित केलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!