दामिनी पालव खून प्रकरणात हत्येसाठी वापरलेला चाकू आणि वाहन जप्त

महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती ; तपासाला वेग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या दामिनी किरण पालव खून प्रकरणाच्या तपासात कुडाळ पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. या गुन्ह्यात हत्येसाठी वापरण्यात आलेला धारदार चाकू आणि संबंधित वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. या वस्तू हस्तगत झाल्यामुळे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून, पुढील तपासाला वेग आला आहे.
या प्रकरणातील संशयित साहिल विश्राम धुरी याला न्यायालयाने २४ ऑक्टोबरपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर कुडाळ पोलिसांनी संशयिताकडे कसून चौकशी सुरू केली. हत्येनंतर गुन्ह्यात वापरलेला चाकू कुठे ठेवला होता, याची माहिती पोलिसांनी त्याच्याकडून घेतली. त्यानुसार संशयिताच्या निदर्शनावरून पोलिसांनी चाकू जप्त केला. तसेच या प्रकरणाशी संबंधित वाहनही हस्तगत करण्यात आले आहे.

चाकू आणि वाहन जप्त झाल्याने तपासाला महत्त्वाची दिशा

गुन्ह्यात वापरलेले हत्यार आणि वाहन हस्तगत झाल्याने या प्रकरणातील घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी पोलिसांना मदत होणार आहे. जप्त केलेल्या वस्तूंची आवश्यक तपासणी आणि त्यातून मिळणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जाणार आहे.
दामिनी पालव हिच्या मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असताना, या प्रकरणातील प्रत्येक महत्त्वाचा दुवा जोडण्यासाठी कुडाळ पोलीस तपास करत आहेत. आता जप्त केलेल्या वस्तूंच्या तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!