आचरा कॉलेजची मुंबई विद्यापीठ महिला विभागीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी

सलग दोन विजयांसह प्रथम स्थान; गार्गी जुवेकर व अपर्णा सिंह यांची धडाकेबाज अर्धशतके


मुंबई विद्यापीठाच्या महिला विभागीय क्रिकेट स्पर्धेत आचरा येथील आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (ACMS) या महाविद्यालयाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. मालवण येथील बोर्डिंग मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत आचरा कॉलेजने साखळी फेरीतील दोन्ही सामने जिंकून गुणतालिकेत प्रथम स्थान मिळविले. या विजयात कर्णधार गार्गी जुवेकर आणि अपर्णा सिंह यांच्या आक्रमक फलंदाजीसह गोलंदाजांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.

स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आचरा कॉलेजचा सामना देवगड येथील एस. एच. केळकर महाविद्यालयाशी झाला. आचरा कॉलेजची कर्णधार गार्गी जुवेकर हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आचरा कॉलेजने १० षटकांत १ बाद १०८ धावा केल्या. गार्गी जुवेकरने नाबाद ३०, तर करिश्मा निंबारेने नाबाद २४ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात एस. एच. केळकर महाविद्यालयाचा संघ १० षटकांत ९ बाद ३४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. शारदा सुर्वेने ३ बळी, तर गार्गी जुवेकरनेही ३ बळी घेत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. भक्ती कविंदे आणि तन्वी पवार यांनीही गोलंदाजीत योगदान दिले. आचरा कॉलेजने हा सामना ७४ धावांनी जिंकला.

दुसऱ्या सामन्यात आचरा कॉलेजसमोर मालवण येथील एस. के. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे आव्हान होते. या सामन्यातही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आचरा कॉलेजने १० षटकांत २ बाद १५० धावांचा डोंगर उभारला. अपर्णा सिंहने ९ चौकारांच्या मदतीने ५२ धावा, तर कर्णधार गार्गी जुवेकरने ७ चौकारांसह ५० धावा करत निवृत्त फलंदाजी केली. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना एस. के. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा संघ १० षटकांत ६ बाद ४३ धावाच करू शकला. गार्गी जुवेकरने एक षटक निर्धाव टाकत २ बळी मिळविले, तर शारदा सुर्वेनेही २ बळी घेतले. तन्वी पवारने १ बळी मिळविला. आचरा कॉलेजने हा सामना तब्बल १०७ धावांनी जिंकत स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल आचरा कॉलेजच्या खेळाडूंना विनर्स स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक संदीप पेडणेकर, सुशील शेडगे आणि ज्ञानेश केळुसकर यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व टीम चे आचरा पीपल्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप मिराशी, कार्यध्यक्ष प्रदीप परबमिराशी, आचरा कॉलेज अध्यक्ष संजय मिराशी, प्राचार्य नितेश सारंग तसेच क्रीडाप्रेमींकडून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!