कुडाळ MIDC परिसरात वाहतूक पोलिसांची धडक

मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

ब्रेथ ॲनालायझरद्वारे वाहनचालकांची तपासणी

कुडाळ एमआयडीसी परिसरात जिल्हा वाहतूक शाखेने शनिवारी रात्री मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात धडक मोहीम राबवली. रात्री ८ वाजल्यापासून कुडाळ-वेंगुर्ला मार्गावर अचानक नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करून वाहन चालवण्याच्या प्रकारांना आळा घालणे आणि संभाव्य अपघात टाळणे, या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली. नाकाबंदीदरम्यान येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. संशयित चालकांची ब्रेथ ॲनालायझर उपकरणाद्वारे तपासणी करून मद्यप्राशन केल्याचे आढळलेल्या चालकांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली.
वाहतूक पोलिसांच्या या मोहिमेमुळे मद्यपान करून बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांना आळा बसण्यास मदत होणार असून, नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. अपघात रोखण्यासाठी अशा तपासणी मोहिमा यापुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.
जिल्हा वाहतूक शाखेच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेंद्र देऊळकर (एचसी ३२), पोलीस कॉन्स्टेबल कांदळगावकर (पीसी २४२), पाटील (पीसी १९७) आणि शरडे (पीसी ९२४) यांच्या पथकाने ही कारवाई केली.

error: Content is protected !!