पहेलगाम हत्त्याकांड : माणुसकीला काळिमा फासणारा हिडीस चेहरा

कणकवलीत श्रद्धांजली सभेत सामाजिक जागृतीचा निर्धार

पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर “आम्ही कणकवलीकर” या संस्थेच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपस्थित वक्त्यांनी या क्रूर हल्ल्याचा तीव्र निषेध करत, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा जागरूक संदेश दिला.
“पहेलगाम हत्त्याकांड हे माणुसकी हरवत चाललेल्या आधुनिक जगाचा हिडीस चेहरा आहे,” अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी भावना व्यक्त केल्या. “एकेकाळचा साम्राज्यवाद आज धार्मिक दहशतवादाच्या क्रूरतेत परिवर्तित झाला आहे आणि आपण भारतीय नागरिक ‘मला काय त्याचे’ अशा निष्क्रिय मनोवृत्तीने गप्प बसतो, हे अधिकच गंभीर आहे,” असे ते म्हणाले.
करंबेळकर पुढे म्हणाले की, “आजचा भारतीय नागरिक ‘मी, माझा पक्ष, माझा नेता’ या वर्तुळात अडकला आहे. ‘मी भारताचा आणि भारत माझा’ ही भावना हरवली आहे. ही भावना पुनःप्रस्थापित करणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल.”
या सभेत डीडी न्यूजचे वरिष्ठ पत्रकार विजय गांवकर यांनीही आपले विचार मांडले. “या हल्ल्यानंतर काश्मिरी जनतेने पर्यटकांचे जीव वाचवण्यासाठी घेतलेली धडपड आशादायक आहे. त्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारी अशी राष्ट्रीय ऐक्यभावना रुजविणे आज अत्यंत गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे, सेवानिवृत्त संघटनेचे सीताराम कुडतरकर, प्रा. हरिभाऊ भिसे यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. विनायक मेस्त्री यांनी शोकसभेचा आढावा घेतला आणि उपस्थितांनी शांततेच्या प्रतिकेप्रमाणे मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
या सभेला सौ. सुप्रिया पाटील, पत्रकार रमेश जोगळे, निवृत्त पोलिस अधिकारी, विविध सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक संवेदनशील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!