शिडवणे नं. 1 शाळेत ‘बाल साहित्य संमेलन’ उत्साहात संपन्न

लेखक निकेत पावसकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
येथील शिडवणे नं. 1 शाळेत गुरुवार, दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी ‘बाल साहित्य संमेलन’ अंतर्गत ‘लेखक कवी पत्रकार तुमच्या भेटीला’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध हस्ताक्षर संग्राहक, लेखक, कवी आणि पत्रकार श्री. निकेत पावसकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना अत्यंत सुंदर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रवीण कुबल यांच्या हस्ते श्री. निकेत पावसकर यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
यानंतर कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वरचित कवितांच्या वाचनाने झाली. मयुरी सुतार, केतन सुतार, श्रेयांश पांचाळ, आर्यन कासार्डेकर आणि श्रेया पाळेकर या युवा कवींनी आपल्या प्रतिभासंपन्न कवितांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे शालेय स्वराज्य मंडळाचे विद्यार्थी मुख्यमंत्री केतन सुतार आणि विद्यार्थिनी मुख्यमंत्री श्रेया पाळेकर यांनी घेतलेली श्री. निकेत पावसकर यांची हृद्य मुलाखत. या मुलाखतीत विद्यार्थ्यांनी श्री. पावसकर यांच्या परिचय, बालपण, लेखन, कविता, पत्रकारिता, हस्ताक्षर संग्रह, शालेय जीवन आणि विद्यार्थ्यांसाठी संदेश अशा विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रश्न विचारून त्यांच्या जीवन प्रवासाचा आणि अनुभवांचा पट उलगडला. श्री. पावसकर यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली आणि मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी केतन सुतार आणि शिक्षिका सौ. सीमा वरुणकर यांनी श्री. निकेत पावसकर यांचे आभार मानले. हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरला. श्री. पावसकर यांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांना साहित्य, लेखन आणि पत्रकारिता या क्षेत्रांविषयी अधिक माहिती मिळाली, तसेच स्वतःच्या कलागुणांना विकसित करण्याची प्रेरणा मिळाली. शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.