कणकवलीत शिक्षक कलाकारांचा बहुरंगी आविष्कार!

यक्ष उद्धार’सह विविध कला प्रकारांची रसिकांना मेजवानी!
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तालुका कणकवली यांच्या त्रैवार्षिक अधिवेशनात केवळ ‘यक्ष उद्धार’ या दशावतारी नाटकानेच नव्हे, तर विविध कला प्रकारांनी रसिकांची मने जिंकली. शिक्षक कलाकारांनी नाट्य, गायन आणि एकपात्री अभिनयाच्या माध्यमातून एक बहुरंगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
‘यक्ष उद्धार’ या नाटकामध्ये संतोष तांबे यांनी यक्षाची प्रभावी भूमिका साकारली, तर सदाशिव राणे यांनी पार्वतीची भूमिका अत्यंत समर्थपणे वटवली. सुरुवातीला बासरीवादन करुन त्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. मंगेश राणे यांचा ब्रम्हराक्षस आणि निलेश ठाकूर यांचा सोमा गुराखी यांच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. राजा सूर्यसूताच्या भूमिकेतील राजेंद्र गोसावी आणि वीरभद्राच्या भूमिकेतील अजय तांबे यांनीही आपल्या भूमिका चोख बजावल्या. सुमतीच्या भूमिकेतील राज कदम आणि चित्रसेन गंधर्वाच्या भूमिकेतील राजाराम भिसे यांच्या अभिनयानेही रंगत आणली. या नाटकात संतोष कुडाळकर यांनी नारदाची भूमिका अत्यंत उत्कृष्टपणे साकारली.
नाटकाच्या संगीताची बाजू सुनिल गावकर (हार्मोनियम), सोहम मेस्त्री (मृदुंग) आणि समर्थ सूतार (झांज) यांनी उत्तमरीत्या सांभाळली. तर, कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात शिक्षक दाम्पत्य दिनेश जंगले आणि ऋतुजा जंगले यांनी गणपती (रिध्दी-सिद्धी) साकारून केली. या संपूर्ण नाटकाचे दिग्दर्शन शिक्षक असलेले मा. संतोष तांबे सर यांनी केले.
या सांस्कृतिक कार्यक्रमात गायन आणि एकपात्री अभिनयाचीही विशेष रंगत भरली होती. रश्मी आंगणे यांनी ‘आई’ या विषयावर एक मार्मिक एकपात्री प्रयोग सादर केला, ज्यामुळे सभागृहातील सर्व प्रेक्षक भावुक झाले होते. त्यांनी ‘गजानना श्री गणराया’ या गाण्याचे सुमधुर गायन करून वातावरण भक्तिमय केले. स्नेहल गोसावी यांनी भालचंद्र महाराजांचे गीत म्हटले, तर इरफान सारंग सरांनी आपल्या हिंदी गीतांच्या गायनाने कार्यक्रमाची लज्जत वाढवली. असरोंडकर मॅडम यांनी गायिलेले ‘नाविका रे’ हे गाणं अप्रतिम झाले. अजय तांबे सरांनी ‘प्रथम नमो गौतमा’ हे भीमगीत जसेच्या तसे गाण्याचा उत्तम प्रयत्न केला, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. स्वराशा कासले यांनी ‘मोगरा फुलला’ हे लोकप्रिय गाणे सुंदरपणे सादर केले, तर संजय तांबे यांनी ‘दिल है के मानता नही’ हे गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दिव्या गोसावी हिने ‘आता गं बया’ हे गाणं उत्तमरीत्या सादर केले आणि संतोष पाटील यांनी ‘सोचेंगे तुम्हे प्यार’ हे गाणे गाऊन कार्यक्रमात प्रेमळ रंग भरला.
एकंदरीत, कणकवलीतील शिक्षक कलाकारांनी ‘यक्ष उद्धार’ सह विविध कला प्रकारांचे प्रभावी प्रदर्शन केले आणि रसिकांच्या मनात एक अविस्मरणीय छाप सोडली. शिक्षक केवळ अध्यापनातच नव्हे, तर कला क्षेत्रातही उत्कृष्ट आहेत, हे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.