जनतेच्या समस्या गतीने सोडवण्यासाठी येत्या काळात “एआय” टेक्नॉलॉजीचा देखील वापर होणार!

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे प्रतिपादन
साकेडी मध्ये जिवंत सातबारा व 100 दिवसांच्या उपक्रमांतर्गत गाव भेट कार्यक्रमाचा शुभारंभ
शासनाने 100 दिवसांमध्ये 7 कलमी कार्यक्रम दिलेला होता. या अंतर्गत तालुका पातळीवर व ग्राम पातळीवर विविध उपक्रम ठरवून देण्यात आले आहेत. यामध्ये जिवंत सातबारा मोहिमेसह जनतेची कामे थेट गावात जाऊन करण्यावर भर देण्याची देखील शासनाचे उद्दिष्ट आहे. व त्या अंतर्गतच आजचा हा गाव भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित झालेले प्रश्न व अन्य कामासाठीचे अर्ज हे तात्काळ मार्गी लावून ग्रामस्थांना नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दिलासा देण्याची भूमिका प्रशासनाची असणार आहे. या अंतर्गत येत्या काळात एआय टेक्नॉलॉजीचा देखील वापर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत. ज्या गावांमध्ये तालुका प्रशासन जात नाही अशी गावे निवडून त्यांना ही सेवा देण्याचा आमचा उद्देश आहे. आजच्या या पहिल्यांदाच तालुक्यात शुभारंभ होत असलेल्या उपक्रमाला जनतेतून आलेला प्रतिसाद पाहता निश्चितच उल्लेखनीय उपस्थिती असल्याचे उद्गार कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी काढले. कणकवली तालुक्यातील साकेडी या गावी राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या साकेडी शाळा नंबर 1 येथील कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार श्री देशपांडे बोलत होते. यावेळी साकेडी सरपंच सुरेश साटम, माजी सरपंच सुविधा गुरव, ग्रामपंचायत सदस्य महम्मद जेऊर शेख, दिगंबर वालावलकर, मंडळ अधिकारी योजना सापळे, ग्रामसेवक प्रियंका राठोड, तलाठी किशोर चौगुले, तलाठी ढाके, तलाठी रावराणे, तंटामुक्त अध्यक्ष राजु सदवडेकर, पोलीस पाटील शैलेश जाधव आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी तहसीलदार श्री देशपांडे पुढे म्हणाले, या गावभेट कार्यक्रमांतर्गत मयत खातेदारांचे वारस तपास, उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी अर्ज, सातबारा मध्ये दुरुस्ती, विविध योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना लाभाचे वाटप, यासह अन्य कामे ही तातडीने मार्गी लावण्यासाठी विशेष मोहिमेद्वारे काम केले जाणार आहे. शासनाने जनतेला तात्काळ व गुणवत्तापूर्वक सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने 100 दिवसांसाठी कार्यक्रमातून दिला असून, यामध्ये तालुकास्तरीय कार्यालयांची स्वच्छता, स्वच्छतागृहांची सफाई करणे, यासह अन्य देखील कामे हाती घेण्यात आली होती. व ती पूर्णत्वास नेली आहेत . तालुक्याची एक वेबसाईट देखील तयार केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात जनतेला चांगल्या दर्जेदार सुविधा पुरवणे सोपे जावे हा यामागचा शासनाचा उद्देश असल्याचे श्री देशपांडे म्हणाले. यावेळी कणकवली तालुका कृषी कार्यालयामार्फत आंबा फळमाशी रक्षक सापळे चे वितरण काही लाभार्थ्यांना करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या प्रस्ताव मंजुरी नंतर या मंजुरी आदेशाची वितरण देखील लाभार्थ्यांना करण्यात आले. तसेच वारस तपासासाठी अर्ज आल्यानंतर परिपूर्ण कागदपत्र असलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून त्यांना तशी नोंद करून वारस रजिस्टर चा उतारा देखील तहसीलदार व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तर गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांना मंजूर आदेशाचे प्रदान करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याशी स्थानिक अनेक समस्यांबाबत चर्चा केली. त्यावेळी प्रामुख्याने सातबारा संगणकीकरण करत असताना त्यामध्ये काही तांत्रिक बाबींमुळे एका खाते नंबर चे अनेक खाते नंबर तयार झाले व यातून त्या खात्यामधील गट नंबर विभागले गेले असल्याची बाब निदर्शनास आणली. गावचे सुमारे 1 हजार 600 खातेदार असून या सर्व खातेदारांच्या मुळ आठ अ वरील नोंदी व विद्यमान नोंदी तपासणी केल्या जातील व त्यानुसार त्याची दुरुस्ती केली जाईल अशी ग्वाही देखील तहसीलदार श्री देशपांडे यांनी दिली. व हा या कार्यक्रमाचा खरा फायदा जनतेला झाल्याचे सिद्ध होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी योजना सापळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रभाकर पावसकर यांनी केले. तर आभार सरपंच सुरेश साटम यांनी मांनले.