शिडवणे ग्रामपंचायती येथे तहसीलदार कार्यालयाचा गावभेट कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र शासन तहसीलदार कार्यालय, कणकवली यांच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत शिडवणे ग्रामपंचायतीमध्ये गावभेट कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमात कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासह पाटील आणि मंडळ अधिकारी बावलेकर यांनी उपस्थिती दर्शविली. शिडवणेचे सरपंच रविंद्र शेट्ये आणि माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मंडळ अधिकारी बावलेकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला.
तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी यावेळी उपस्थित नागरिकांच्या जमिनीविषयक विविध शंकांचे निरसन केले आणि आवश्यक दाखल्यांचे समारंभपूर्वक वितरण केले. नागरिकांनी विचारलेल्या काही समस्यांवर तहसीलदार आणि त्यांच्या टीमने तात्काळ तोडगा काढला, ज्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.
या महत्वपूर्ण कार्यक्रमाला वारगावचे उपसरपंच नाना शेट्ये, तलाठी आमरसकर, पोलीस पाटील समीर कुडतरकर, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पांचाळ, शिडवणे उपसरपंच दिपक पाटणकर, कोनेवाडीचे मुख्याध्यापक प्रशांत कुडतरकर, कृषी अधिकारी सागर चव्हाण, शिडवणे ग्रामसेवक देवेंद्र नलावडे, ग्रामपंचायत सदस्य दयानंद कुडतरकर आणि अनेक लाभार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शिडवणे नं. १ शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी केले, तर माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार यांनी उपस्थितांचे आभार मानले. गावभेट कार्यक्रमाची उत्तम तयारी केल्याबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांनी शिडवणे ग्रामपंचायतीचे कौतुक केले.

error: Content is protected !!