बिडवलकर खून प्रकरणात राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप असण्याच्या दृष्टीने तपास करा

मा. आम. वैभव नाईक यांच्यासह शिवसेना शिष्टमंडळाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी

निपक्षपातीपणे तपास करण्याची पोलीस अधीक्षकांची ग्वाही

       सिद्धीविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर खून प्रकरणाबाबत आज माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, गुरु पेडणेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांची ओरोस येथे भेट घेतली. यावेळी बिडवलकर खून प्रकरणात राजकीय बड्या नेत्याचा हस्तक्षेप असल्याचा आम्हाला संशय असून पोलिसांनी त्यादृष्टीने देखील तपास करावा. त्याचबरोबर २ वर्षांनंतर या घटनेची माहिती पोलिसांना कोणी दिली. त्या व्यक्तींची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांकडे केली. तसेच त्याबाबतचे निवेदन देण्यात आले.त्यावर निपक्षपातीपणे तपास करण्याची ग्वाही पोलीस अधीक्षकांनी  दिली आहे.

       शिवसेना शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील सिद्धीविनायक उर्फ पक्या अंकुश  बिडवलकर हे मार्च २०२३ पासून बेपत्ता असून त्यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी सिद्धेश अशोक शिरसाट (वय ४४ रा. पानबाजार कुडाळ) व अन्य ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. २ वर्षानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. यातील सिद्धेश अशोक शिरसाट हा सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी असल्याकारणामुळेच गेली २ वर्षे सत्तेचा दुरुपयोग करून राजकीय बड्या नेत्याकडून हा गुन्हा लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे. तरी हा गुन्हा लपवून गुन्हेगारांना वाचविण्यासाठी कोणत्या राजकीय बड्या नेत्याचा वरदहस्त होता का? त्यादृष्टीने देखील तपास करून याची सखोल चौकशी करावी. राजकीय बड्या नेत्याचा या गुन्ह्यात हस्तक्षेप असल्यास त्यालाही सहआरोपी करण्यात यावे व बिडवलकर कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यात यावा.

     काही दिवसांपूर्वी अमेय नाडकर्णी यांचा जो अपघात झाला तो अपघात कि घातपात ? या अपघातातील गाडी सिद्धेश अशोक शिरसाट यांची होती का ? याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी तसेच कुडाळ तालुक्यामध्ये गेल्या २ वर्षात ज्या व्यक्ती बेपत्ता आहेत व ज्यांचा अजून तपास लागलेला नाही अशा घटनांची सखोल चौकशी आपणामार्फत करण्यात यावी. अशी मागणी निवेदनात केली आहे.
error: Content is protected !!