सावडाव येथील सावंत कुटुंबियांना अमानुष मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी कारवाई करा

शिवसेना ठाकरे गट शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
सावडाव येथील नयना सावंत व वैभव सावंत या दोन व्यक्ती माहिती अधिकारी कार्यकर्ते म्हणून काम करतात. त्यानुषंगाने सावडाव ग्रामपंचायत संदर्भात स्ट्रीट लाईट व रस्त्याच्या कामामध्ये जो भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे हा भ्रष्टाचार नयना सावंत व वैभव सावंत यांनी माहितीच्या अधिकारात उघड केला. याच्या रागातून माजी सरपंच दत्ताराम काटे व त्यांच्या सहकार्यांनी नयना सावंत व वैभव सावंत यांना अमानुष मारहाण केली. नयना सावंत यांचे अंगावरील जॅकेट काढून त्यांचे टी शर्ट काढण्याचा प्रयत्न करून विनयभंग केलेला आहे. आजही नयना सावंत व वैभव सावंत हे ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे असताना अद्याप कणकवली पोलिसांनी या आरोपींविरुद्ध कलम ३०७ दाखल करून कारवाई केलेली नाही. या आरोपींना सत्तारूढ पक्षाचा वरदहस्त असल्यामुळे पोलीस यंत्रणा आपले काहीच करू शकत नाही या अविर्भावात आजही हे आरोपी मोकाट फिरत आहेत.तरी याप्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी देखील शिवसेना शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.