रोटरी क्लब कणकवलीच्या फिजिओथेरपी सेंटरचा शुभारंभ

मोफत कॅम्पला रुग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
रोटरी क्लब कणकवली सेंट्रलने यावर्षी समाजसेवेचे नवीन पाऊल उचलून रेल्वे स्टेशनजवळील जानकी बेलवलकर सभागृहात फिजिओथेरपी सेंटर सुरु केले आहे. त्याचा शुभारंभ रविवारी कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत यांच्याहस्ते व रोटरी पदाधिकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब कणकवलीचे सेवाभावी उपक्रम सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे सांगत अजित सावंत यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला रोटरीचे जिल्हा समन्वयक राजेश घाटवळ, अजय गांगण, रोटरी कणकवलीचे अध्यक्ष प्रा. जगदीश राणे, चार्टर अध्यक्ष दीपक बेलवलकर, अॅड. दीपक अंधारी, सिताराम उर्फ दादा कुडतरकर, महेंद्र मुरकर, सौ. मेघा गांगण, सौ. सुप्रिया नलावडे, सौ. राजश्री रावराणे, लिना काळसेकर, डॉ. धनंजय रासम, डॉ. अमेय मराठे, अनिल कर्पे, धनंजय कसवणकर, लवू पिळणकर, फिजिओथेरपीस्ट डॉ. शुक्ला व सहाय्यक उपस्थित होते.
यावेळी रोटरीचे जिल्हा समन्वयक राजेश घाटवळ यांनी रोटरी कणकवलीचे सेवाभावी उपक्रम अविरतपणे सुरु असतात. सर्वसामान्यांसाठी या उपक्रमांचा चांगला फायदा होतो असे सांगितले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. जगदीश राणे यांनी आपल्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या योगदानातून फिजिओथेरपी सेंटर सारखा उपक्रम सुरु झाल्याचे समाधान असल्याचे सांगितले. तर अॅड. दीपक अंधारी यांनी फिजिओथेरपी सेंटर सुरु करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. सर्वसामान्यांसाठी फिजिओथेरपीचे विविध उपचार अतिशय अल्प दरात केले जाणार असून यापूर्वी सुरु केलेले सर्व उपक्रम जनतेसाठी फलदायी ठरल्याचे सांगितले. सुत्रसंचालन दादा कुडतरकर यांनी केले. रविवारी सेंटरच्या शुभारंभानंतर मोफत फिजिओथेरपी कॅम्पमध्ये 32 जणांनी लाभ घेतला. तर 16 फेब्रुवारीलाही मोफत फिजिओथेरपी कॅम्प होणार असून त्याचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.