अवैध सिलिका वाळू उत्खनन व वाहतूकीला आळा घालण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती

निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव हे असणार पथक प्रमुख

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली होती तक्रार

कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडून पथक नियुक्तीचे आदेश

कणकवली तालुक्यातील अवैध सिलिका वाळू उत्खनन व वाहतूक प्रकरणी कणकवली तहसीलदारांच्या आदेशाने तालुक्यात तीन मंडळांमध्ये भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाचे निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव हे पथक प्रमुख असणार आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी अवैध सिलिका उत्खनन व वाहतूक प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत ही पथके गठीत करण्यात आल्याने आता अवैध सिलिका व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
कणकवली तालुक्यात अवैध सिलिका वाळू उत्खनन प्रकरणी तीन महसूल मंडळांमध्ये ही पथके गठीत करण्यात आली आहेत. त्यामध्ये त्या मंडळाचे मंडळ अधिकारी व त्या मंडळांमधील येणारे सर्व तलाठी यांचा या पथकामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्या महसूल मंडळांमधील अवैध उत्खनन व वाहतूक याची पाहणी करणे व पाहणी केल्यानंतर त्याबाबत रीतसर कारवाई करणे याची जबाबदारी या पथकाकडे देण्यात आली आहे. तर पथक प्रमुख म्हणून निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव यांच्याजवळ देखील या सर्व अवैध उत्खनन व वाहतुकीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी काही दिवसांपूर्वी याबाबतची तक्रार केल्यानंतर याबाबत अवैध मायनिंग व्यवसायिकांची धाबे दणाणले होते. अवैध वाहतूक व उत्खनन यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत असून शासनाची फसवणूक केली जात असल्याचा आरोप श्री नाईक यांनी केला होता. तसेच लाखो रुपयांचा दंड करून देखील या दंडाची वसुली झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यापूर्वी एका महसूल अधिकाऱ्यावर देखील श्री नाइक यांनी आरोप करत काही मायनिंग व्यवसायिकांशी बैठक घेतल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणी महसूल विभागाने गांभीर्याने दखल घेत याबाबत ही पथके गठीत केली आहेत. त्यामुळे या पथकांमार्फत आता अवैध सिलिका वाहतूक व उत्खनन रोखले जाणार का? ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

error: Content is protected !!