कुंभमेळ्यासाठी प्रयागराज ला जाणाऱ्या विशेष रेल्वेला सावंतवाडी – कणकवलीत थांबा द्या!

माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणेंची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे मागणी
सिंधुदुर्गातील अनेक लोक कुंभमेळ्याला जाण्यासाठी आहेत इच्छुक
महा-कुंभाच्या शुभ मुहूर्तावर मडगाव, गोवा ते प्रयागराज दरम्यानच्या विशेष रेल्वे सुरू केल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांचे माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी आभार व्यक्त केले आहेत. या रेल्वेला सिंधुदुर्गात थांबा देण्याची मागणी खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, ही सेवा कोकण रेल्वे मार्गावर फेब्रुवारी 2025 मध्ये 3 दिवस चालणार आहे.
विशेष सेवा मार्गाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात महा-कुंभाच्या दर्शनासाठी असंख्य भाविक उत्सुक आहेत. दुर्दैवाने सिंधुदुर्गातील एकाही स्थानकाला या सेवांसाठी थांबा दिला जात नाही. रेल्वे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविकांमध्ये निराशा आणि संताप व्यक्त होत आहे.
भाविकांना महा-कुंभाचे दर्शन घेता यावे यासाठी सिंधुदुर्गातील सावंतवाडी आणि कणकवली स्थानकांवरील मडगाव-प्रयागराज विशेष सेवांना थांबा देण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.