तिलारी घाट आजपासून बंद

रस्त्याची दुरुस्ती ; घाटातून प्रवास करण्यास सर्वच वाहनांना बंदी

तिलारी घाटातील खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आज (ता.३) पासून सुरु करण्यात येणार आहे.यामुळे तिलारी घाटातून दोडामार्गहून बेळगाव व कोल्हापूरकडे जाणारी सर्व वाहने बंद करण्यात आली आहेत.चंदगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता काम सुरू करण्यात येणार असल्याने सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालावी आणि रस्त्याच्या कामात अडथळा येणार नाही यासाठी सहकार्य करावे, असे पत्र दोडामार्ग पोलिस निरीक्षकांना लिहिले आहे.काम सुरु असताना जिवित व वित्तहानी होणार नाही यासाठी तिलारी घाटातील वाहतूक आपल्या स्तरावरून थांबवण्यात यावी असेही त्या पत्रात म्हटले आहे.त्यामुळे तिलारी घाटातील वाहतूक पूर्णतः बंद असणार आहे.
दरम्यान,तिलारी घाटातून एसटी बस सुरु व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले.त्यातून ही दुरुस्ती होत आहे.काही काळ वाहनचालक,प्रवासी यांची गैरसोय होईल. पण, रस्ता निर्धोक बनणार असल्याने सहकार्य करावे,असे आवाहन सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस,दत्ताराम देसाई आदींनी केले आहे.
…….

कोणते मार्ग खुले आहेत?

गेल्या काही महिन्यांत तिलारी घाटातून ये जा करणाऱ्या प्रवासी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे.हा रस्ता वाहनांसाठी रस्ता बंद असल्याने दोडामार्गमध्ये आल्यावर वाहनचालकांना झरेबांबर तिठा, खोक्रल, मांगेली तळेवाडीतून चोर्लेमार्गे बेळगाव, कोल्हापूरला जाता येणार आहे.तसेच तळकट,कुंभवडे,आंबोली मार्गेही बेळगाव ,कोल्हापूरला जाता येणार आहे. ज्यांना ऑफ रोडींगची आवड आहे, त्यांच्यासाठी मोर्ले पारगड आणि तेरवण ते तेरवण मार्गाचा पर्यायही खुला आहे.
……….
गॅबियन भिंत उभारली जाणार

रस्ता कोसळलेल्या ठिकाणी साधारणपणे सात मीटर उंचीची गॅबियन भिंत उभारण्यात येणार आहे. भिंतीची लांबी तेरा मीटर असणार आहे.‌काम करणारी एजन्सी ( ठेकेदार ) सांगली येथील आहे. गॅबियन हा एक पिंजरा असतो, जो काँक्रीट, खडक, वाळू आणि मातीने भरलेला असतो. भविष्यात पुन्हा रस्ता कोसळू नये म्हणून गॅबियन भिंत बांधली जाणार आहे.यासाठी कमीत कमी १५ ते २० दिवस लागणार आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!