हत्तींकडून सातत्याने शेती आणि माड बागायतीचे नुकसान
मोर्लेतील बेर्डे कुटुंबीय हवालदिल
खायचे काय आणि जगायचे कसे असा प्रश्न
दोडामार्ग : हत्तींकडून सातत्याने शेती आणि माड बागायतीचे नुकसान केले जात असल्याने मोर्ले येथील बेर्डे कुटुंबीय कोलमडून गेले आहे. मुंबई सोडून गाव गाठले. कष्ट करुन शेती बागायती उभी केली; पण हत्ती रुपी संकट आले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. आता जगायचे कसे आणि खायचे काय असा प्रश्न चंद्रकांत लाडू बेर्डे आणि सत्यवान चंद्रकांत बेर्डे या बापलेकांना पडला आहे.
या आठवड्यात हत्तींनी त्यांच्या शेती बागायतीत घुसून केळीची बाग उध्वस्त केली. माड जमीनदोस्त केले. अन्य शेती आणि फळझाडे भुईसपाट केली. नव्या उमेदीने उभा केलेला संसार असा डोळ्यासमोर कोसळताना पाहून बाप लेकाचे डोळे पाण्याने डबडबले नाहीत तरच नवल! सरकारने योग्य भरपाई देऊन शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद जागवावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे; पण सरकार सत्ता टिकवण्यासाठी राजकारणात व्यस्त आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघायला वेळ तरी कुठे आहे असेच खेदाने म्हणावे लागेल. दररोज उध्वस्त होणारा शेतकरी आणि त्याचा संसार पाहून तरी सरकारने डोळे उघडावेत अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.
प्रतिनिधी, कोकण नाऊ,दोडामार्ग