आचरा वासिय गुंतले वेशीबाहेर राहुट्या उभारण्यात
वेध आता गावपळणीचे
गावपळणीचे दिवस जवळ आल्याने गावच्या वेशीबाहेर वस्ती साठी निवारा उभारण्यासाठी सध्या ग्रामस्थ गुंतले आहेत.
रविवार 15डिसेंबरला दुपारी दोन नंतर इशारा होताच गावपळणीला सुरुवात होणार आहे आणि बघता बघता गाव निर्मनुष्य होणार आहे.पुढील तीन दिवस आणि तीन रात्री गडबड वाढणार आहे ती वेशीबाहेर.सुमारे आठ हजाराच्या वर वस्ती असलेले आचरा गाव गावपळणीसाठी निर्मनुष्य होणार आहे. गावपळणीत गावच वेशीबाहेर जाणार असल्याने वेशीबाहेर राहण्यासाठी राहुट्या उभारण्याची गडबड सुरु झाली आहे.
पारवाडी खाडी किनारी, भगवंतगड माळरानावर, वायंगणी, आडबंदर आदीभागात ग्रामस्थ राहुट्या उभारुन निवारा बनविण्यात मग्न झाले आहेत.
यासाठी
चिव्याच्या काठ्या,जंगली वासे याबरोबरच आधुनिक साधनांचाही वापर केला जात असल्याचे पारवाडी ग्रामस्थ पपी पारकर नारायण धुरी सांगतात. काही ठिकाणी संपूर्ण चिव्याच्या काठ्या वापरुन माडापासून बनविलेल्या झापांचा आधार घेत तर काहींनी ताडपत्रीचा वापर करुन निवारयासाठी राहुट्या उभारल्या आहेत. कष्टाच्या गोष्टी असूनही सर्व जण गावपळणीच्या आनंदाचा उत्साह अंगात संचारल्याप्रमाणे झपाटल्यासारखे आनंद घेत काम करत आहेत. यासाठी चाकरमानीही दाखल झाले आहेत. याबाबत मुंबई येथून आलेले पपी पारकर सांगतात. गावपळणीचे वर्ष आले की देव दिवाळीला गावपळणीचा कौल होतो का याकडे आम्हा चाकरमान्यांचे लक्ष लागलेले असते.तो झाला की आमच्या अंगात वेगळीच उर्जा निर्माण होते आणि कधी एकदा गावात जाऊन गावपळणीची तयारी करतो असे होते. आता आम्ही राहुट्या उभारताना मच्छर मुंग्यांचा त्रास होतो. मात्र गावपळणी मध्ये आम्हाला ना मच्छरचा त्रास ना इतर जिवाणूंचा असे पारकर सांगतात. पारवाडी येथिल अनेक गावपळणीचा अनुभव घेतलेले जेष्ठ नागरिक नारायण धुरी सांगतात गावपळण म्हणजे आमच्या साठी आनंदच असतो.पुन्हा एकदा तरुण झाल्यासारखे वाटते. तर देवूळवाडी येथील चंदू आडवलकर सांगतात गावपळणीत वेशीबाहेर राहुट्या उभारुन राहण्यात वेगळीच मजा असते. सर्व जण आपला त्रास, राग वैर विसरून एकत्र रममाण होत असतो.