सप्तरंगांची उधळण करुन झाराप गावात रंगपंचमी साजरी

प्रतिनिधी । सिंधुदूर्ग : सप्तरंगाची उधळण करत आज कुडाळ तालुक्यातील झाराप गावात धुलीवंदनाच्या दिवशी घराघरात, रस्तोरस्ती, वाडीवाडी मध्ये आनंदी वातावरण पाहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही झारापवासीयांनी सप्तरंगाची उधळण केली. ढोल ताशांच्या गजरात झाराप गाव दुमदुमले होते.


आयुष्यात रंग भरणाऱ्या धुलीवंदनानिमित्त झाराप गावात गेले पाच दिवस उत्साहाचे वातावरण होते. बच्चे कंपनी विविध रंगांच्या पिचकाऱ्या, वॉटर बॉल घेऊन घराबाहेर पडली होती. त्यात तरुणही-तरुणी मागे नव्हते. एकमेकांवर रंगाचे उधळण करत प्रत्येक जण रंगोत्सवाचा आनंद लुटत होता. प्रत्येकाचे चेहरे रंगाने माखून गेले होते. पाण्याचा वापर टाळत एकमेकांना कोरडे रंग लावण्यावर भर दिला होता. रस्त्यावर रंग लावणाऱ्या तरुणांचे ग्रुप दिसून आले. सगळ्यांनी एकमेकांच्या सोबतची छायाचित्रे, सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट देखील केली होती . सायंकाळी ग्रामदेवता भावई मंदिरात पारंपरिक पद्धतीने धुळवड साजरी करण्यात आली विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते .

घोडेमोडणी खास आकर्षण

शिमग्याचा अविस्मरणीय अनुभव घ्यायचा असेल तर झाराप गावातील शिमगा पहावा. प्रत्येक गावातील प्रथा वेगळ्या. पण हा गांव शिमगोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. येथील घोडेमोडणी खूप प्रसिद्ध. सर्वात मोठा घोडेमोडणी उत्सव झाराप गावात होतो. झाराप गावात घोडेमोडणीची ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. आजही या गावांनी ती राखून ठेवली आहे, हे विशेष. या गावात हरमलकर कुटुंबिय लोक राहतात. त्यामुळे पूर्वी त्यांना जसे मानाने घोडेमोडणीला बोलाविले जायचे, तसेच आजही बोलाविले जाते. एकूणच हा सोहळा पाहण्यासारखाच असतो. झाराप गावात भावई मंदिर येथील घोडेमोडणी तर पाहण्या सारखी ढोलताशांचे लयबद्ध वादन, नृत्य, अविस्मरणीय अशीच.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!