आता ‘ती’च्या घराचे स्वप्न दृष्टीक्षेपात !

कुडाळ पं.स. मुळे दिसला आशेचा किरण
महिला दिनी झाला घर बांधकामाचा शुभारंभ
प्रतिनिधी । कुडाळ : झोपडीतून चार भिंतीच्या घरात वावरण्याचे साळगांव गावातील गरीब महिला सौ.ज्योत्स्ना जयवंत माळकर हिचे स्वप्न अवघ्या एक ते दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. या घरबांधणी कामाचा शुभारंभ बुधवारी 8 मार्च रोजी महिला दिनी झाला. मालकर यांचे स्वप्न सत्यात उतरव ण्याचे काम या महिलेसाठी आशेचे किरण ठरलेले कुडाळ पचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी केले आहे
साळगाव येथील छत्र हरपलेल्या गरीब महिला सौ.ज्योत्स्ना माळकर हिला घर बांधून देणे या गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या स्वप्नातील कामाला 8 मार्च जागतिक महिला दिनी शुभारंभ झाला आणि त्या महिलेच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. या आनंदाने खऱ्या अर्थाने या महिला दिनाचे सार्थक झाले असेच म्हणावे लागेल.
दरवर्षी 8 मार्चला जागतिक महिला दिन विविध उपक्रमानी साजरा केला जातो. हा दिन साजरा करताना अजूनही बऱ्याच महिलांचे प्रश्न, सामाजिक समस्या आर्थिक दृष्ट्या होणारी ओढाताण, सातत्याने अन्यायाला सामोरे जाणारी स्त्री हे प्रश्न पाहता आजची स्त्री ही आजच्या संगणकीय युगात खरोखरच सर्वागीण विकासाने परिपूर्ण आत्मनिर्भर आहे का? याचे उत्तर सर्रास नाहीच मिळते. आजही समाजात वावरताना स्त्री सुरक्षित नाही. ग्रामीण भागात तर अनेक महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आर्थिक दृष्ट्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काही महिलांना तर आपले कुटूंब सांभाळताना तारेवरची कसरत करत दैनंदिन जीवन जगावे लागत आहे. काहीजणांना घर नसताना उघड्यावर संसार करावा लागत आहे. हे अतिशय विदारक चित्र आजही माहिती तंत्रज्ञानाच्या युगात दिसत आहे.

असेच चित्र साळगाव येथे दिसले. नवरा व मुलीसोबत झोपडीत राहणाऱ्या माळकर या महिलेची भयावह स्थिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी तिच्या घरी जाऊन पाहिली. आपण या महिलेला घर बांधून द्यावे हा उदात्त दूरदृष्टीकोन जोपासून श्री चव्हाण यानी जागतिक महिला दिनी तिचे व तिच्या कुटुंबियांचे स्वप्न सत्यात उतरविण्याचे काम केले आहे.
बुधवारी पंचायत समितीच्या सर्व विभागाच्या टीमचे तिच्या घरी आगमन होताच तिच्या आनंदाला उधाण आले डोळ्यात आनंदाअश्रू दिसत होते. याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या महिलेची ओटी भरण्यात आली. घराच्या कामाचा शुभारंभ सरपंच सौ.अनघा दळवी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, मृणाल कार्लेकर, पूजा पिंगुळकर, एस एस सावंत, नंदू धामापूरकर, शेखर माळकर, विलास गोसावी, रश्मी गुरव, विनिता रायकर, मनीषा तिडके, राखी बांधेलकर, सुमित्रा पेडणेकर, विजया रसाळ, निधी कडुलकर, शीतल गंगावणे, धनश्री बावकर, दीक्षा माळकर, स्मिता माळकर, अनुसया धनवे, सोनिया पाझरे, सानिका चव्हाण, अश्विनी कुडाळकर, जयवंत माळकर, माजी उपसरपंच अमित दळवी, संतोष सावंत, मुलगी कु.समीक्षा माळकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
माळकर यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचा शब्द मला आशेचा किरण ठरला अशा शब्दात सौ माळकर यांनी आपला आनंद व्यक्त केला. मागील सप्टेंबर 2022 मध्ये या महिलेचे घर पावसाने पडले होते. त्यापासून ती प्लास्टिक कापड घेऊन झोपडीसारख्या घरात राहत होती. अनेक संकटांना सामोरे जात असताना 25 सप्टेंबरला गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी या ठिकाणी भेट देऊन विदारक स्थितीची पाहणी केली. नवरा अपंग, बारा ते पंधरा वर्षांची मुलगी हे तिचे कुटूंब आहे. या कुटूंबाचा मोठा आधार 18 वर्षाचा त्याचा मुलगा 2013 ला पाण्यात पडल्याने या जगात नाही या मोठया धक्यातून हे कुटुंब अजूनही सावरले नाही.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





