स्वयंभू मंदिर, नागवे रोड चे काम सुरू करा अन्यथा उपोषण!
जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई यांच्यासह नागरिकांचा निवेदनाद्वारे इशारा
कणकवली शहरातील पटकी देवी ते नागवे रस्ता हे काम वारंवार सांगून देखील अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाकडे या संदर्भात गेली तीन वर्षे सातत्याने नागरिकांचा पत्रव्यवहार चालू आहे. कार्यालयाकडून वारंवार आश्वासन देऊन हा रस्ता अद्याप दुरुस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे मधलीवाडी, निम्मेवाडी, सुतारवाडी, भटवाडी व स्वयंभू मंदिरात जाणाऱ्या भाविकांना व नागरिकांना नाहक त्रास होत आहे. मार्च महिन्याअखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास २ एप्रिल २०२३ नंतर केव्हाही नागरिकांसमवेत उपोषण करण्यात येईल असा इशारा जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, विलास राणे, चारूदत्त साटम, सुशील पारकर, दत्ताराम राणे, संजय करंबेळकर आदींनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता के. के. प्रभू यांना दिला आहे.
दिगंबर वालावलकर / कणकवली