निष्पाप गुरे ठरताहेत बेपर्वाईचे बळी

मोकाट गुरांची काळजी कोण घेणार? सुन्न करणारा प्रश्न


दोडामार्ग
मोकाट गुरांचे निष्काळजी मालक आणि बेपर्वा वाहनचालक यामुळे येथील बाजारपेठेतील निष्पाप गुरांचे बळी जात आहेत.दोडामार्ग गोवा मार्गावर येथील जुन्या पोलिस ठाण्याच्या इमारतीजवळ रस्त्यात पडलेला वासराचा मृतदेह आणि त्याच्याजवळ उभी राहून विलाप करणारी गाय पाहून कुणाच्याची काळजाचे पाणी होईल.ही घटना मंगळवार (ता.१६) रात्री अकरा साडे अकराची.कुठल्या तरी वाहनाने गायीसोबत चालणाऱ्या वासराला धडक दिल्याने वासरू रस्त्यातच गतप्राण होऊन पडले होते तर बाजूला गाय हंबरडा फोडून वासराला जणू उठायला सांगत होती.रात्रीची वेळ असल्याने आणखी एखादे वाहन वासरावरून जाईल म्हणून त्याला उचलून बाजूला केले.प्रश्न इथे संपत नाही.ज्याची ही गुरे आहेत त्या मालकाला जरासुद्धा त्यांची काळजी वाटत नाही याचं दुःख आहे.त्याहीपेक्षा रस्त्यात मोकाट फिरणाऱ्या गुरांना वाहतुकीचे नियम माहीत नाहीत,त्यामुळे आपणच शिस्तीत वाहने हाकायला हवी याची अक्कलही काही वाहनचालकांना नसावी याचही दुःख आहे.त्यातच कसई दोडामार्ग नगरपंचायत या मोकाट गुरांसाठी काय करते ही प्रश्न आहेच.नगराध्यक्ष,मुख्याधिकारी,वाहतूक पोलिस आणि या गुरांचे मालक यांची संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढायला हवा,नाहीतर असे निष्पाप जीव रस्त्यातच बळी जातील.

error: Content is protected !!