तृतीयपंथीच्या वेशात शहरात फिरणारे ३ तरुण सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात
कारवाईची नागरिकांकडून मागणी
सावंतवाडी, सावंतवाडी शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून स्त्रीवेशात दहशत माजविणाऱ्या तिघांना पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती. सदरचे दहशत माजविणारे तिघे बुलढाणा येथील असून ते सध्या कुडाळ रेल्वेस्थानक’ परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. हे तिघेही स्त्रीवेशात शहरातील लोकांच्या घरात घुसून महिलांना दमदाटी करीत मोठ्या रकमेची मागणी करीत असल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली होती. नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र ते शहरातून बाहेर पडले होते. सोमवारी पुन्हा हे तिघे शहरात रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांकडून पैसे मागत होते. मोठ्या आवाजात ओरडत वाहन चालक, पादचारांना पैशांसाठी दमदाटी करीत असल्याने त्या बाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले. ते तिघे मद्याच्या नशेत असल्याने त्यांची वैद्यकिय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर त्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या तिघांकडून भविष्यात पुन्हा असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे या तिघांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.