गारगोटीच्या सिंधुदुर्गात आलेल्या “त्या” प्रशिक्षण केंद्राला कारणे दाखवा नोटीस

प्रशिक्षणार्थींना सुविधा न देणे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राला भोवणार?

यशदा ला देखील सिंधुदुर्गातील प्रशिक्षणाच्या सावळ्या गोंधळाचा अहवाल पाठवला

कणकवली : यशदा च्या वतीने ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र गारगोटी यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आर आर आबा सुंदर गाव योजना अंतर्गत निवड झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच यांना तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणा दरम्यान ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र गारगोटी यांच्याकडून प्रशिक्षणार्थी ना कोणत्याही सुविधा दिल्या गेलेल्या नसल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. दरम्यान याबाबत सर्वप्रथम कोकण नाऊ न्यूज चॅनेल च्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर याची तात्काळ दखल जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी घेतली. व तातडीने दुसऱ्या दिवशी या प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थींना होणारी गैरसोय व तेथे असलेल्या असुविधा या अनुषंगाने जिल्हा परिषद चे विस्तार अधिकारी यांना प्रशिक्षण स्थळी वस्तुस्थिती तपासणी करिता पाठवले होते. या अधिकाऱ्यांमार्फत या संपूर्ण प्रशिक्षणा दरम्यान आवश्यक उपाययोजनांची सुविधा न केल्याबाबत माहिती घेण्यात आली. व त्या नुसार अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. याबाबत वृत्त प्रसारित झाल्यानंतर त्याची उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी देखील तात्काळ दखल घेतली होती. त्यानुसार जिल्हा परिषद कडून ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र गारगोटी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे अशी माहिती श्री. तनपुरे यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या प्रशिक्षणाकरिता एकूण 45 प्रशिक्षणार्थींना संधी मिळणार होती. मात्र ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र गारगोटी यांच्याकडून केलेल्या ढिसाळ नियोजनाचा फटका जिल्ह्यातील प्रशिक्षणातील ना बसला. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रशिक्षणार्थी करिता पिण्याची पाण्याची व्यवस्था न करणे, प्रशिक्षणाचे शेड्युल निश्चित करून त्यानुसार मार्गदर्शन न करणे, उपस्थित प्रशिक्षणार्थींच्या उपस्थिती बाबत सह्या न घेणे यासह अन्य महत्त्वाच्या बाबींमुळे या प्रशिक्षण वर्गात सावळा गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण स्थळी योग्य त्या सेवा, सुविधा देण्याकरिता शासनाकडून प्रशिक्षण केंद्राला निधी दिला जात असताना हा निधी उरवण्याचा धक्कादायक प्रकार देखील या निमित्ताने समोर आला होता. त्यामुळे ही गंभीर बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राला नोटीस बजावून त्यांना खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती श्री. तनपुरे यांनी दिली. तसेच एकूणच या साऱ्या प्रकाराचा अहवाल यशदा यांना देखील पाठवला असल्याचे सांगण्यात आले.

दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!