दुसऱ्यांच्या वेदना दूर करण्या सारखा आनंद नाही – डॉ.वसंत करंबेळकर

नेरुरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचा पुढाकार

प्रतिनिधी । कुडाळ : दुसऱ्यांच्या वेदना दूर करण्यासारखा आनंद नाही.ज्या हॉस्पिटलच्या वास्तूमध्ये आपण काही काळ आरोग्यसेवा केली. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने रुग्णसेवा केली .ते हॉस्पिटल बॅरिस्टर नाथ पै संस्थेच्या पुढाकाराने आता नव्याने उभे रहते आहे. हे पाहिल्यानंतर आपल्याला फार आनंद होतो आहे. असे उद्गार नेरूर येथील ज्येष्ठ -जुन्या पिढीतील डॉक्टर वसंत करंबेळकर यांनी काढले . नेरूर येथील इंगेश रुग्णालयात झालेल्या मोफत आरोग्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या आरोग्य शिबिराला फार चांगला प्रतिसाद लाभला. नामांकित डॉक्टर्सनी आरोग्य तपासणी केली.


जागतिक परिचारिका तथा मातृदिनाच्या निमित्ताने कुडाळ तालुका पत्रकार समिती, कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर, जिल्हा शासकीय रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल, बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालय , बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट यांच्या वतीने नेरूर येथील कै.यशवंतराव नाईक -इंगेश -हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उदघाटन डॉ. वसंत करंबेळकर यांच्या सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि फ्लोरिंग नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या पहिल्या प्राचार्य वैशाली गावडे, सिंधुदुर्गातील तज्ञ डॉक्टर संजीव अकेरकर, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर योगेश नवांगुळ, डॉ. चरमचेरला हेमचंद, डॉ.गौरव घुर्यें ,कोल्हापूर सिद्धगिरी हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉ.शंतनू पालकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश जोशी, चेअरमन उमेश गाळवणकर , फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ.सेधूराजा, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी व विविध तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. वसंत करंबेळकर पुढे म्हणाले, आर्थिक लाभाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकीच्या नात्याने चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांच्या बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे नर्सिंग महाविद्यालय, फिजीओथेरपी महाविद्यालय हा गोरगरिबांसाठी आरोग्य सेवेचा सामाजिक उपक्रम राबवत आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तेवढेच थोडे आहेत. हा जनसेवेचा घेतलेला वसा त्यांनी असाच पुढे चालू ठेवावा. अनेक अडचणी या येतच राहणार आहेत. त्याच्यावर मात करून सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे असे सांगत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना वैशाली गावडे म्हणाल्या, आम्ही परिचारका आहोत हाच आमचा परिचय .असे समजून या क्षेत्रात उतरलेल्यांनी काम करावे. आपल्या सेवा वृत्तीने गोरगरिबांना मदत होते आहे .हेच आपले भाग्य समजून नर्सेस व डॉक्टरनी काम करावे. अनुभवाबरोबर ज्ञानाची जोड द्यावी आणि उमेश गाळवणकर या रुग्णालयाच्या पुनर्जीवितेसाठी जे झपाटलेपणाने हे काम करत आहेत त्यांना बळ द्यावे. काळाची गरज ओळखून विविध कोर्स सुरू करणारे उमेश गाळवणकर यांच्या महान कार्याला समाजाने पाठबळ द्यावे .असे आवाहनही सौ. गावडे यांनी केले.
डॉ.संजीव आकेरकर म्हणले, समाजसेवेच्या उद्देशाने अशा प्रकारच्या आयोजित केल्या जाणाऱ्या आरोग्य शिबिरामध्ये आपण सर्वतोपरी मदत करायला तयार असल्याचे” सांगत शिबिरास शुभेच्छा दिल्या. कुडाळ तालुका पत्रकार समितेचे अध्यक्ष निलेश जोशी यांनी या निरिच्छ,निर्लोभी, सेवाभावी संस्थांच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराचा स्थानिक रुग्णांनी लाभ घ्यावा असे सांगत शिबिरास शुभेच्छा दिल्या. डॉक्टर योगेश नवांगुळ यांनी रुग्णांच्या जीवनातल दुःख दूर करण्यासाठीच्या मोफत आरोग्यशिबिराचे कौतुक करीत शिबिरास शुभेच्छा दिल्या.
या आरोग्य शिबिराचा नेरुर परिसरातील एकूण ७० विविध रुग्णांनी लाभ घेतला व या शिबिराच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. या शिबिरामध्ये चेतन कोरे, सौरभ बालम, डॉ चरमचेरला हेमचंद, डॉ एन एस मकर, डॉ योगिता राणे व फिजिओथेरपी विभागाचे विविध डॉक्टर, नर्सिंग महाविद्यालयाच्या नर्सेस यांनी रुग्णांवर उपचार करून त्यांना सेवा सुविधा दिल्या दिल्या. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी शिबिराच्यां यशस्वीतेसाठी फार मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली मयेकर, वैशाली ओटवणेकर व सहकारी यांनी केले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!