दिवंगत आदरणीय मदन राजाराम बागवे उर्फ बापू यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
मसुरे(प्रतिनिधि)
मसुरा एज्युकेशन सोसायटीचे माजी चिटणीस दिवंगत बापूंनी चार दशकांहून जास्त काळ चिटणीस पदाची धूरा संभाळून संस्थेची शुन्यातून उभारणी त्यांनी केली होती त्याची आठवण पुढील अनेक पिढ्यांपर्यंत लोकांच्या स्मरणात राहील. मुंबईत वास्तव्य करीत असतांना मसुरे पंचक्रोशीतील वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांशी संपर्क ठेवून सुमारे ५०० किलो मिटर दूरवर असलेल्या मसुरे सारख्या दूर्गम व डोंगराळ भागात या शिक्षण संस्थेचे संचलन करणे, ते सुद्धा प्रतिकूल आर्थिक परिस्थितीस सामोरे जाऊन, ही एक अदभुत किमया होती. अशा शब्दात मसुरा एज्युकेशन सोसायटी मुंबईच्या वतीने जे डी बागवे यांनी आदरांजली व्यक्त केली आहे
स्व मदन राजाराम कथा बापू बागवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ही आदरांजली संस्थेच्या वतीने जे डी बागवे यांनी व्यक्त केले आहे.
सुरुवातीला १९४४ पासून भरतगड माध्यमिक विद्यालय -१ (आताचे आर पी बागवे विद्यालय ) माध्यमिक स्तरावर शाळा मसुरे मर्डे येथे असतांनाच, खेरवंद, वेरली, बागायत, देऊळवाडा या सारख्या दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी देऊळवाडा येथे स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने १९६२ साली माध्यमिक शाळा सुरू केली. तर आपल्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखांमध्ये जाण्यासाठी विज्ञान विषयाची अकरावीची शाखा १९७८-७९ मध्ये सुरू करण्यात आली. कालांतराने या शाखेकडे जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत गेल्याने व पटसंख्येचे निकष पूर्ण करणे अशक्य झाल्याने +२ स्तरावरील किमान कौशल्यावर आधारित रोजगाराभिमूख तंत्रशिक्षणाचे मेकानिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी चे तीन ट्रेंड (अकरावी व बारावी) १९९०-९१ पासून सुरू करण्यात आले. हे वर्ग सुरू करण्यासाठी संस्थेचे माजी अध्यक्ष दिवंगत आदरणीय दिगंबर महादेव बागवे यांचे योगदान फार मोठे होते.”असे जे डी बागवे यांनी म्हटले आहे
आज याच तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य वीज मंडळाच्या कार्यालयात, मुंबई पुणे ठाणे यांसारख्या प्रस्थापित शहरातील खाजगी आस्थापनांमध्ये अनेकांना नोक-या मिळविता आल्या आहेत. तर मालवण, कणकवली देवगड तालुका स्तरावर व जवळपासच्या ग्रामीण भागात फॅब्रिकेशन व वीजेवर चालणा-या उपकरणांच्या दुरुस्तीचे स्वतंत्र व्यवसाय उभारले आहेत. या सर्व प्रगतीच्या मागे दिवंगत बापूंनी दिलेली दिशा व परिपक्व धोरणी योगदान फार मोलाचे होते.
दिवंगत बापूंच्या नजरेसमोर सातत्याने एकच ध्यास असायचा तो म्हणजे मसुरे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी प्रगतीशील उत्तम शैक्षणिक सुविधा निर्माण करणे. आपल्या गावात विविध सोयी सुविधा उपलब्ध करणे, विविध वाडी वस्त्यां मधे शासनाच्या योजना आणण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी ते नेहमीच अग्रेसर असत. अशा या महान शिक्षण महर्षींचे अल्पशा आजाराने दिनांक ११ मे १९९७ रोजी निधन झाले. आज जरी ते आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी केलेले विविध स्तरावरील कार्य सर्वांच्या सतत डोळ्यासमोर प्रदीर्घ काळ राहील. त्यांनी दाखविलेला स्वप्न पूर्तीचा मार्ग पूर्ण करण्यासाठी भावी पिढीने पुढाकार घेऊन योगदान द्यावे हीच ख-या अर्थाने दिवंगत बापूंना वाहिलेली श्रद्धांजली असेल. दिवंगत बापूंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन असे मसुरा एज्युकेशन सोसायटी मुंबई च्या वतीने जे. डी बागवे यांनी म्हटले आहे.