मराठी चित्रपट दिग्दर्शक अभिजित वारंग यांचा मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे सत्कार

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या परंपरा, संस्कृती, कला या जगासमोर आणण्याच्या दृष्टीने आपण विविध चित्रपट बनवत आहोत. दशावतार सारख्या आद्य कलेवर आधारित मी बनविलेल्या पिकासो या चित्रपटासाठी आपणास उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र या चित्रपटांना जिल्ह्यातच म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आपल्या संस्कृतीवर आधारित चित्रपटांना आपलेच लोक थिएटर देत नाहीत. आपलेच लोक चित्रपट पाहत नाहीत हि मोठी शोकांतिका आहे. कलाकारांना आणि त्यांच्या कलाकृतीना स्थानिकांनी पाठबळ दिले पाहिजे, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक अभिजित वारंग यांनी येथे केले.
येथील मातृत्व आधार फाऊंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे बॅ. नाथ. पै. सेवांगण येथे आयोजित कार्यक्रमात मूळ सिंधुदुर्गातील असलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक अभिजित वारंग व तारकर्लीच्या अभिनेत्री नमिता गावकर यांचा चित्रपट सृष्टीतल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. वारंग यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अभिनेत्री नमिता गावकर यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर नायब तहसीलदार आनंद मालवणकर, पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, मातृत्व आधार फाउंडेशन संस्थेचे संस्थापक संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना दिग्दर्शक अभिजित वारंग म्हणाले, इथली दशावतार कला आणि गावपळण प्रथा यावर आपण चित्रपट बनविले. पिकोलो या नवीन चित्रपटातून स्थानिक कलाकारांना संधी दिली. विविध फिल्म फेस्टिवल मध्ये या चित्रपटांना चांगले यश मिळाले. मात्र आपल्याच स्थानिकांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही, चित्रपटांना जिल्ह्यात थिएटर दिले गेले नाही, या सर्वाची मला खंत आहे. आज मातृत्व आधार फाउंडेशनने केलेला सत्कार जिल्ह्यातील माझा पहिलाच सत्कार आहे. होळी, शिमगा यावर आधारित रोंबाट हा चित्रपट आपण बनविणार आहोत, त्यासाठी येथील जनतेने सहकार्य करावे, इथल्या स्थानिक कलाकारांवर माझा विश्वास आहे, असेही श्री. वारंग म्हणाले.
यावेळी नमिता गावकर यांनीही स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन व पाठीवर कौतुकाची थाप मिळत नसल्याबाबत खंत व्यक्त करत मातृत्व आधार फाउंडेशन सारखी संस्था नेहमीच कलाकारांचे कौतुक करून पाठबळ देत आहे, असे सांगितले. तर आनंद मालवणकर यांनी मातृत्व आधार फाउंडेशनच्या करायचे कौतुक करत उपेक्षित वर्गाला मदत करण्याचे, त्यांना पुढे आणण्याचे काम संस्था करत असल्याचे सांगितले.
यावेळी इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संतोष लुडबे यांनी केले. सूत्रसंचालन करत विनोद सातार्डेकर यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे सचिव विश्वास गावकर, मालवण लायन्स क्लबच्या अध्यक्ष वैशाली शंकरदास, सोनाली पाटकर, दिक्षा गावकर, दीपक कुडाळकर, उत्तम पेडणेकर, अंकुश घाडीगावकर, पोलीस कर्मचारी आरोलकर, ज्योती तोडणकर, रेश्मा मोरजकर, नूतन समाज नाट्य मंडळ वायरीचे सदस्य व इतर उपस्थित होते.

प्रतिनिधी / कोकण नाऊ / मालवण

error: Content is protected !!