नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी लढणार नाही ;मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केली भूमिका…

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला त्याबद्दल त्यांचे आभार

महायुतीच्या नेत्यांनी लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावा

मुंबई – नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी न लढण्याचा निर्णय घेतला असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन महायुतीची ताकद अधिक वाढवणार असल्याची घोषणा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली.

आज मुंबई येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

होळीच्या दिवशी अजितदादांचा निरोप आला म्हणून आम्ही त्यांची भेट घेतली त्यांनी दिल्लीचा निरोप दिला गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीमध्ये नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली तेव्हा अजितदादांनी समीर भुजबळ यांच्यासाठी जागा मागितली परंतु अमित शहा यांनी माझं नाव सांगितले. त्यानंतर निर्णय घेण्यासाठी मी एक दिवसाची वेळ मागितली. मात्र दुसऱ्या दिवशीही माझंच नाव फायनल झाल्याचे मला सांगण्यात आले. त्यामुळे मी नाशिकला येऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून मते जाणून घेतली. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला असेही छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

नाशिकमध्ये मला विविध पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला. नाशिकच्या विकासासाठी मराठा, दलित, ब्राम्हण, ओबीसी यासह सर्व समाजाने नाशिकच्या विकासासाठी पाठिंबा दिला. त्यानुसार आम्ही तयारी करण्यास सुरुवात केली. मात्र तीन आठवड्याचा वेळ होऊन उमेदवारी जाहीर झाली नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार तीन आठवड्यापासून सुरू आहे. नाशिकची उमेदवारी जाहीर करायला अधिक उशीर होत असल्याने महायुतीचे नुकसान होऊ शकत त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वांच्या मनातील संदिग्धता दूर करण्यासाठी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

मी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी सुचवले होते. त्यांनी केलेल्या आग्रहाबद्दल छगन भुजबळ यांनी यावेळी त्यांचे विशेष आभार मानले. तसेच नाशिकच्या विकासाकडे बघून मराठा समाजासह विविध समाज बांधवांनी विविध पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी मला जो पाठिंबा दिला त्यांचेही छगन भुजबळ यांनी आभार मानले.

error: Content is protected !!