“सेवानिवृत्तीनंतरचे जीवन अक्षर साहित्याच्या सहवासात घालवा! आनंदाची दामदुप्पट मिळवा!” सुरेश ठाकूर.

आचरा–अर्जुन बापर्डेकर “सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदमय होण्यासाठी निवृत्तीवेतनावर लक्ष ठेवण्यापेक्षा आवडणारे; पण सेवेच्या काळात पूर्ण होऊ न शकलेले नानाविध छंद जोपासा. सर्व छंदात दर्जेदार छंद साहित्याचा! अक्षर साहित्याच्या वाचनाने, लेखनाने, चिंतनाने आणि उपयोजनाने आपण सर्वजण निवृत्तीनंतरही पुन्हा आपल्या यौवनात प्रवेश करीत असतो. आपले विचार, आपल्या कल्पना, विविध विषयातील गोष्टी यांना आपण ज्यावेळी शब्दरूप देतो, त्यावेळी आपणास खरे सौख्य प्राप्त होते. अक्षरांच्या आनंदाची गणना, त्याचे मोजमाप अजून पर्यंत कोणालाही करता आलेले नाही,” असे उद्गार कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणचे विद्यमान अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांनी जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे संपन्न झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन, मालवणच्या वार्षिक मेळाव्यात मार्गदर्शन करताना काढले.
‘आनंद अक्षरांचा’ या विषयावर त्यांचे प्रबोधन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय रोहिदास चौकेकर, अध्यक्ष- सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन, मालवण हे होते.
आपले विचार मांडताना ठाकूर पुढे म्हणाले, “सेवानिवृत्तीनंतर आपण अक्षरांच्या आनंदात मनसोक्त डुंबायला शिकले पाहिजे. आपले अनुभवविश्व शब्दबद्ध केले पाहिजे.” हे पटवून देताना त्यांनी मालवण तालुक्यातूनच सेवानिवृत्त झालेल्या अनुक्रमे द. शि. हिर्लेकर गुरुजी यांचे ‘स्वप्नपूर्ती’, सुधाकर गुडेकर यांचे ‘कृतज्ञ मी – कृतार्थ मी’, मधुकर राणे गुरुजी यांचे ‘सावध तो सुखी’ आदी अनेक प्राथमिक शिक्षकांच्या आत्मवृत्तांचा उल्लेख केला. सेवानिवृत्तीनंतर आपण सहा वर्षे लोकमत साठी चालविलेले ‘फेरफटका’ सदर, ‘शतदा प्रेम करावे’ सारख्या ललित पुस्तकाची निर्मिती, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या सहकार्यातून संपादित केलेली ‘सिंधूसाहित्य सरिता’ (चरित्र ग्रंथ), ‘ये ग $ ये ग$ सरी’ (कविता संग्रह), ‘बीज अंकुरे अंकुरे’ (ललित) आदी पुस्तकांच्या निर्मितीचे दाखले दिले.
सदर प्रबोधनाला सावळाराम आणावकर, प्रवीण कोल्हे (पोलीस निरीक्षक मालवण), कृष्णा पाताडे, भालचंद्र चव्हाण, मनोहर सरमळकर, ज्ञानदेव ढोलम, मधुकर राणे, मिनल सारंग, सुरेश चव्हाण, आनंद धुत्रे यांच्यासहित प्रमुख मान्यवर आणि बहुसंख्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीमती सुगंधा गुरव यांनी तर आभार श्रीम. रूपाली पेंडूरकर यांनी बांधले.

error: Content is protected !!