आपुलकी , प्रेम स्नेहमेळावाने वृद्धींगत होते – प्रविण कोल्हे, पोलिस निरीक्षक

स्नेहमेळावा हे एक निमित्त असते. या स्नेहमेळाव्यातून एकमेकांची सुखदुःख जाणून घेता येतात . एकमेकांशी प्रेमाचे , आपुलकीचे संवाद होतात . भूतकाळातील आठवणींना उजाळा मिळतो . एक नवी उर्मी जीवन जगण्याला मिळते आणि एकमेकांबद्दलचे प्रेम , आदर , आपुलकी वाढीस लागते. असे प्रतिपादन मा . श्री . प्रविण कोल्हे पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे मालवण यांनी केले .

     सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा मालवणच्या वतीने  नुकताच जिल्हा परिषद शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षक , पदवीधर शिक्षक , केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक , विस्तार अधिकारी  यांचा स्नेहमेळावा जानकी मंगल कार्यालय जरीमरी कुंभारमाठ येथे  आयोजित करण्यात आला होता . या स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते .      

      यावेळी त्यांच्या समवेत विचारमंचावर जिल्हाअध्यक्ष सावळाराम अणावकर , जिल्हा सरचिटणीस सुंदर पारकर , जिल्हा सदस्य कृष्णा पाताडे , तालुकाध्यक्ष विजय चौकेकर , तालुका सचिव आनंद धुत्रे , सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी भालचंद्र चव्हाण , कोमसापचे तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर , देवगड तालुकाध्यक्ष मधुकर राणे , ज्येष्ठ शिक्षिका प्रभा केळूसकर , ज्येष्ठ शिक्षक  व लेखक मधुकर राणे , कुडाळ तालुका सचिव मनोहर सरमळकर , कल्याण कदम आदी मान्यवर उपस्थित होते .

      यावेळी प्रविण कोल्हे यांनी ज्येष्ठांना कायदेविषयक मार्गदर्शन करताना जेष्ठांचे हक्क कोणते आहे ? मुले जर आपले पालन पोषण करण्यास असमर्थता दाखवित असतील तर त्यावर कायद्याने कोणाकडे न्याय मिळवू शकता या विषयी सविस्तर माहिती दिली . तसेच ज्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथ असतील तरच डाव्या बाजूने चालावे अन्यथा रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे आणि स्वतःचे अपघातापासून संरक्षण करावे असेही आवाहन केले. ज्येष्ठांनी आपली आयुष्यभराची कमाई कोणत्याही स्कीम मध्ये गुंतवून  स्वतःची फसवणूक करून घेऊ नका असे ही सांगितले .

   या मेळाव्याच्या सुरुवातीला खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे हि साने गुरुजींची प्रार्थना मनाली फाटक आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी सुमधूर आवाजात सादर केली .

तर डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त त्यांना अभिवादन म्हणून त्यांनी लिहिलेल्या संविधानातील प्रास्ताविक सुगंधा गुरव यांनी उपस्थित सर्वांकडून म्हणून घेतले .
कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन मा . प्रविण कोल्हे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . तर छ. शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले आणि डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले .

    यावेळी जानेवारी २२ ते मार्च २४ अखेर सेवानिवृत्त झालेल्या  सर्व प्राथमिक शिक्षकांचा शाल श्रीफळ गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला ,तर मार्च २४ पर्यत ७५ वर्ष पूर्ण केलेल्या व त्यावरील सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल श्रीफळ गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला . सेवानिवृत्त शिक्षकांमधून अरुग्ण गोसावी , शोभा पालव , अनुपमा पालव , दत्तात्रय गांवकर , विभावरी मुंडले , कृष्णा पाताडे ,वसंत चव्हाण , सदाशिव गावडे आदींनी मनोगते व्यक्त केली .

     जिल्हाअध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी संघटनेची ध्येय धोरणे आणि जिल्हा कार्यकारीणी सेवा निवृत्त शिक्षकांसाठी जिल्हा पातळीवर कोणत्या पद्धतीने अधिकार्यांशी संवाद साधून न्याय मिळवून देते याबाबत माहिती दिली .

     अक्षरांचा आनंद या विषयावर जेष्ठांसाठी प्रबोधनात्मक मार्गदर्शन करताना कोमसाप मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी जिल्ह्यातील शिक्षकांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांची ओळख करून देताना स्वतःचे अनुभव लिहायला शिका . त्याचा फायदा इतरांना होऊ शकतो हे सांगताना मालवण तालुक्यातील शिक्षकांनी यातून कशी प्रेरणा घेतली आणि पहाता पहाता तीन दर्जेदार पुस्तकांची निर्मिती कशी झाली याची माहिती देऊन या अक्षरांतून जीवनात कसा आनंद मिळवाल या बाबत प्रबोधन केले .

  तालुकाअध्यक्ष  विजय चौकेकर यांनी सेवानिवृती नंतर शिक्षक खरेच आनंदी असतो का? आनंदी जीवनासाठी काय करावे याची माहिती देऊन शिक्षकांनी जी जबाबदारी माझ्या वर सोपविली आहे त्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीन आणि शिक्षकांच्या प्रश्नांचा शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करीत राहून तुमचे सर्वांचे प्रश्न सोडविण्यासाठी करिबद्ध राहीन असे सांगितले .

    यावेळी मान्यवरांमधून भालचंद्र चव्हाण , मनोहर सरमळकर , मधुकर राणे प्रभा केळूसकर लेखक मधुकर राणे आदींनी उपस्थितांना संबोधित केले .

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिनल सारंग , श्रृती गोगटे ज्ञानदेव ढोलम , रामचंद्र वाळके , नरेश पालव , विशाखा तारी , अरुण गोसावी आदींनी मेहनत घेतली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुगंधा गुरव यांनी केले . प्रास्ताविक आनंद धुत्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन रुपाली पेंडूरकर यांनी केले.
स्नेहमेळावाचा आनंद मालवण तालुक्यातील खेडोपाड्यातून आलेल्या सव्वाशे शिक्षकांनी घेतला .

error: Content is protected !!