संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘कोल्हापूरची कलासंस्कृती’ प्रदर्शन उत्साहात संपन्न

अतिग्रे – संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये डे बोर्डिंग विभागात ‘लिओनार्डो दा विंची’ यांच्या जयंतीनिमित्त ‘जागतिक कला दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दळवीज आर्टस् स्कुलच्या माजी प्राचार्या अस्मिता जगताप, प्रख्यात चित्रकार श्री विजय टिपूगडे, कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे समन्वयक श्री. प्रशांत जाधव उपस्थित होते. ‘कोल्हापूरची कलासंस्कृती’ या थीमवर आधारित यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या विविध कलाकृतींचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन अस्मिता जगताप व संचालिका-प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी केले. यावेळी बोलताना अस्मिता जगताप म्हणाल्या, “कला व कलाकार हे समाजाचे अविभाज्य घटक आहेत. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना भविष्यात कला क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कला क्षेत्रातील अनेक माध्यमांची व कोल्हापूरच्या कला विश्वाची माहिती करून देणारे हे एक अतिशय सुंदर असे कला प्रदर्शन आहे.”
या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या चित्रकलांचे प्रदर्शन होते. त्यामध्ये कोल्हापूरची निसर्गचित्रे व ऐतिहासिक स्थळे तसेच शाहू महाराज, अंबाबाई मंदिर, रंकाळा, ही विशेष आकर्षक चित्रे होती. या प्रदर्शनातील सर्व चित्रे विद्यार्थ्यांनी रेखाटली होती. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकनृत्य, धनगरी नृत्य ही कला सादर केली. कॅनव्हास पेपर, जलरंग वापरून विद्यार्थ्यांनी चित्रे काढली होती. या कला प्रदर्शनामध्ये प्रख्यात चित्रकार आबालाल रहमान, दत्तोबा दळवी, बाबुराव पेंटर यांच्या चित्रांच्या प्रतिकृती प्रदर्शनात मांडल्या होत्या. कला विभागप्रमुख श्री. अनिल शिंदे-पाटील, कलाशिक्षिका समीना मुजावर, व कलाशिक्षक श्री चैतन्य शिंदे यांनी हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी कला प्रदर्शनास भेट दिली. सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले. संचालिका-प्राचार्या सस्मिता मोहंती, प्राचार्य डॉ.एच.एम नवीन, प्राचार्य नितेश नाडे, उपप्राचार्य अस्कर अली, उपप्राचार्या अर्चना पाटील, उपप्राचार्य हैदर अली यांनी या कला प्रदर्शनाचे कौतुक केले.