पाच वर्षांपुर्वी हरवलेल्या आसामच्या मनोरूग्ण सनुराम दासची संविता आश्रमच्या कार्यकर्त्यांनी घडवीली आईशी पुर्नभेट

आसाम विधानसभेचे आमदार अजयकुमार राय यांचे कुटुंब पुनर्मिलनात झाले मोलाचे सहाय्य
देशभरातील रस्त्यावरच्या निराधार, वयोवृध्द, आजारी, जख्मी , वंचित व बेघर तसेच मनोरूग्णांच्या पुनर्वसनासाठी संदिप परब यांची जीवन आनंद संस्था कार्य करीत आहे. देशातील प्रत्येक निराधार बांधवाला माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळाले पाहिजे.हे ब्रीद घेवून संस्थेचे कार्य सुरू आहे.
पाच वर्षांपुर्वी मानसिक स्थीती बिघडलेली असताना आसाम राज्यातील दातुरी या छोट्याशा खेड्यातील सनुराम दास हा घरातून बाहेर पडला. आणि तो थेट पोहचला हजारो किलोमीटर दूर असलेल्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात. सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रूग्णालयातून या अनोळखी युवकाला आजारातून बरे झाल्यानंतर पुनर्वसनासाठी दि.६ सप्टेंबर,२०२१ रोजी पणदूरच्या संविता आश्रमात दाखल करण्यात आले.
संविता आश्रमातील सेवा कार्यकर्त्यांच्या उपचाराने व मानसोपचारतज्ञ डाँ.धुरी यांच्यामानसोपचाराने सनुराम हळूहळू बरा झाला. त्याने हल्लीच मार्च -२४ मधे जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांना त्याच्या आसाममधील गावाची माहिती दिली. त्यांनी गुगलद्वारे सनुरामच्या मु. दातुरी ता. बिजनी जि.चिरांग या गावाचा शोध घेवून आझाममधील स्थानिक आमदार अजयकुमार राय यांचेशी संपर्क केला. व सनुरामच्या कुटुंब पुनर्मिलन साठी सहाय्य करण्याचे त्यांना आवाहन केले.
माणूसकीच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या आमदार अजयकुमार यांनी तात्काळ प्रतिसाद देवून सनुरामच्या आईला त्यांच्या हरवलेल्या मुलाचा शोध लागल्याची आनंदाची बातमी दिली. इतकेच नाही तर या गरीब मजूर महिलेच्या मुलाला घरी परतण्यासाठी , त्याला त्याच्या आईच्या ताब्यासाठी आवश्यक सारी व्यवस्था केली. संविता आश्रमातील सोशल वर्कर माधव पाटिल यांनी नुकतेच सनुरामला रेल्वेने आसामला त्याचे दातुरी नेवून आई व लेकराची पुनर्भेट घडवून आणली. एकुलता एक सनुराम मनोरूग्णावस्थेत घरातून निघून गेल्याच्या घटनेनंतर आई जयंती दासचे सारे जीवनच दुःखाने भरून गेले होते. त्या त्यांचे राहते घर सोडून मुलीच्या घरी राहत होत्या.
जयंती आणि सनुराम या मायलेकरांची तब्बल पाच वर्षांनी जेव्हा पुर्नभेट झाली. तेव्हा या भेटीचे साक्षीदार असलेल्या समस्त दातुरी ग्रामस्थांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू ओघळले. सनुरामची आई जयंती दास यांनी जीवन आनंद संस्था आणि आमदार अजयकुमार कुमार हे त्यांच्या मदतीला देवासारखे धावून आल्याचे सांगून त्यांचे आभार मानले.
किसन चौरे, कोकणनाऊ