मालवणी भाषा गौरव दिनी सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान यांच्या लक्ष्मण साबाजी पवार मालवणी साहित्य पुरस्काराचे वितरण.
मालवणी साहित्य सम्राट गंगाराम गवाणकर आणि जनसेवा प्रतिष्ठानचे डॉ संजीव लिंगवत यांच्या उपस्थितीत मालवणी संस्कृती जपणारे नाचे सुरेश चव्हाण आणि नामदेव चव्हाण यांना पुरस्कार प्रदान.
कणकवली/मयुर ठाकूर
मालवणी मुलखात नाचो, गोमू, कोळीण, खेळे या होळीच्या दिवसातील पारंपरिक कला सादर करून मालवणी संस्कृती जिवंत ठेवणाऱ्या सर्व कलाकारांचा प्रातिनिधिक सत्कार सोनवडे, घोटगे ता. कुडाळ येथील सुरेश रामा चव्हाण आणि नामदेव रामा चव्हाण यांना लक्ष्मण साबाजी पवार मालवणी साहित्य पुरस्कार , प्रसिद्ध नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते देवून केला गेला. यावेळी व्यासपीठावर जनसेवा प्रतिष्ठानचे डॉ संजीव लिंगवत तसेच सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानचे शुभांगी पवार, डॉ सतीश पवार हे उपस्थित होते. सदर कार्यक्रम कणकवली नगर वाचनालय इथे पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मच्छिंद्र कांबळी आणि सदाशिव पवार गुरुजी, लक्ष्मण पवार आणि सरस्वती पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून गंगाराम गवाणकर आणि डॉक्टर लिंगवत यांनी केली.
यावेळी प्रास्ताविक करताना डॉ सतीश पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपली भाषा ही कुडाळी भाषा म्हणून ओळखली जात होती. १९१४ साली मालवणचे डॉ भांडारकर यांनी एका लेखात तिला मालवणी असे संबोधले. त्यापासून मालवणी भाषा असे म्हणणे चालू झाले. त्यावेळी या भाषेला कुडाळी म्हणावे की मालवणी म्हणावे असा मोठा वाद सुद्धा झाला होता.
होळीच्या नृत्य प्रकाराला साहित्य पुरस्कार द्यावा का असा प्रश्न उपस्थित करून त्याचे उत्तर देताना साहित्य हे केवळ लेखन या गोष्टीशी निगडित नसून विश्वात जे जे आपल्याला सुंदर वाटते ते साहित्य या प्रकारात येते असे डॉ सतीश पवार यांनी सांगितले.
व्यासपीठावरून बोलताना डॉ संजीव लिंगवत यांनी तळागाळातील कलाकारांची आठवण या पुरस्काराच्या निमित्ताने सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान करत आहे, हे प्रेरणादायी आहे असे सांगून आपण सातवी आठवीत असताना टेप रेकॉर्डर वर ऐकलेले पहिले नाटक म्हणजे ” वस्त्रहरण ” असे सांगून जुन्या काळातील मालवणी भाषेच्या स्मृती जागवल्या.
ज्यांच्या लेखनामुळे मालवणी भाषा ही एक अत्यंत लोकप्रिय भाषा झाली आहे , ते गंगाराम गवाणकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना वस्त्रहरण नाटकाच्या आणि मच्छिंद्र कांबळी यांच्या हृद्य स्मृती जागवल्या. वस्त्रहरण हे नाटक अगोदर ” आज काय नाटक होवचा नाय ” या नावाने लिहिले होते. नंतर त्याचे नाव बदलून ” वस्त्रहरण ” ठेवले गेले. नाटकातील नाटक असे याचे स्वरूप रसिकांच्या लक्षात आले नाही. कोकणात तर हे नाटक म्हणजे आमच्या दशावतारी नाटकाची विडंबना आहे या गैरसमजातून बंद पाडले गेले.
अखेर हे तोट्यात चाललेले नाटक एक शेवटचा प्रयोग पुण्यात करून कायमचे बंद करायचे असे निर्मात्यांनी ठरवले. गंभीर, न हसणाऱ्या पुण्याच्या प्रेक्षकांसमोर हा प्रयोग होणार होता. त्याला पू ल देशपांडे आपल्या बारा साथीदारांना घेवून हे नाटक पाहायला आले आणि हसून हसून त्यांच्या बरगड्या सुद्धा दुखायला लागल्या. पू ल देशपांडे यांनी पत्र लिहून या नाटकाला भरभरून दाद दिली. त्याची प्रसिद्धी होताच हे नाटक नंतर हाऊसफुल होऊ लागले.
संपूर्ण जगात फक्त मालवणी या बोलीभाषेतील या नाटकाने ५४०० प्रयोग केले आहेत. हा विश्वविक्रम आहे.
सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान अत्यंत महत्वाच्या कलांना पुरस्कार देवून मालवणी संस्कृती वाढवायचे काम करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
सूत्रसंचालक निलेश पवार यांनी सुरेश चव्हाण आणि नामदेव चव्हाण यांची प्रकट मुलाखत घेवून कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना नामदेव चव्हाण यांनी नाचो म्हणून काम करतानाचे शिमग्याचे दिवस रसिकांसमोर उभे केले.
नाचो, गोमू, कोळीण, खेळे या मालवणी मुलखातील कलाप्रकारात साधारणपणे एक पुरुष कलाकार स्त्रिवेष परिधान करून सोबत पाच सहा सोबती आणि वाद्यांचा छोटा ताफा घेवून गावातील सर्व घरासमोरील अंगणात नृत्य सादर करून होळी या सणाची परंपरा साजरी करतात.
यावेळी सकाळी दहा वाजता सुरू झालेला हा मेळा रात्री उशिरापर्यंत सर्व ठिकाणी न थकता जात असे. हे दमवणारे काम असले तरी मालवणी जीवनाच्या प्रेमामुळे आम्ही ते निष्ठेने केले. आज यामध्येही परजिल्ह्यातील लोकांचे अतिक्रमण होत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कार्यक्रमाला मालवणी रसिक तसेच अंधश्रद्धा निर्मूलन जिल्हाध्यक्ष विजय चौकेकर , पत्रकार राजन लाड, कवयित्री रीमा भोसले, प्रगती पाताडे आदि मान्यवर उपस्थित होते. सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानचे सरिता पवार, नुपूर पवार , हर्षदा सरमळकर , हरिश्चंद्र सरमळकर , वैदेही कदम, चंद्रकांत कदम आदि उपस्थित होते. आभार वेदान्त पवार यांनी , सूत्रसंचालन नीलेश पवार , तांत्रिक सहाय्य शैलेश घाडी , भूषण मेस्त्री, मनाली राणे यांनी केले.
मालवणी भाषा गौरव दिवस मच्छिंद्र कांबळी यांच्या जयंती दिवशी साजरा केला जातो. सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान यांच्या तर्फे मालवणी भाषा वृद्धीचे कार्यक्रम करायचे हे तिसरे वर्ष आहे.