विद्यार्थ्यांनी करिअरच्या वाटेवर चालताना भविष्यातील ध्येय, धोरण निश्चित करून शैक्षणिक वाटचाल केली पाहिजे – सतीश सावंत

सिंधुदुर्गच्या भविष्याचा सन्मान आम्ही करतो हे आमचे कर्तव्य – सुशांत नाईक
ठाकरे शिवसेनेच्या वतीने देवगड तालुक्यातील गुणवंतांचा सन्मान
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे इयत्ता दहावीच्या परीक्षेत देवगड तालुक्यातील शाळांमध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज पार पडला. शिवसेना-युवासेना देवगड यांच्यावतीने हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा उबाठा शिवसेनेचे विधानसभाप्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव-सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उपजिल्हाप्रमुख यदू ठाकुर, संदीप कदम, युवासेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, जयेश नर, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख हर्षा ठाकुर, जि. प. माजी सदस्य विष्णू घाडी, माजी सभापती संजय देवरुखकर आदी उपस्थित होते.
सतीश सावंत म्हणाले, विद्यार्थ्यांनी करिअरच्या वाटेवर चालताना भविष्यातील ध्येय, धोरण निश्चित करून शैक्षणिक वाटचाल केली पाहिजे. विविध भाषांचे ज्ञानही आपल्याला करिअरच्या अनेक संधी उपलब्ध करून देऊ शकते. विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत मिळालेल्या गुणांवरून महाविद्यालयीन शिक्षणाची शाखा ठरविण्यापेक्षा भविष्यात आपल्याला काय करायचे आहे, याची ध्येय निश्चिती करून शिक्षण घ्यावे. सरकारी नोकरीचा राजकीय नेतृत्वाशी संबंध नसतो. सरकारी नोकरीच्या आमिषाने कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा हाती घेऊ नये. आजच्या युवा पिढीला योग्य मार्गदर्शन मिळाले, तरच ही युवा पिढी आदर्श नागरिक बनेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
सुशांत नाईक म्हणाले, सध्याचे युग हे स्पर्धात्मक आहे. खेळ असो, अभ्यास असो की डिजिटल युग असो… आज सर्वच क्षेत्रात गुणवत्तेची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाकडे एकाग्रता व आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. आजचे विद्यार्थी हे सिंधुदुर्गचे भविष्य आहेत. सिंधुदुर्गच्या भविष्यातील जडणघडणीत आजच्या विद्यार्थ्यांनी मोलाचा वाटा उचलावा. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यातून सिंधुदुर्गच्या पुढील भवितव्याचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटत आहे, असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी येथे व्यक्त केले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करण्याची शिकवण प्रत्येक शिवसैनिकाला दिली आहे. त्या शिकवणीतून आजचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम पार पडत आहे. आजचे विद्यार्थी हे सिंधुदुर्गचे भविष्य आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा सत्कार करणे हे अनिवार्य आहे. त्यामुळे कणकवली विधानसभेतील देवगड, वैभववाडी व कणकवली तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही करीत असून यात एक वेगळा आनंद आम्हाला मिळत आहे. सिंधुदुर्ग हे भविष्य चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करू नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आजची युवा पिढी ड्रग्जसारख्या अमली पदार्थाच्या विळख्यात सापडू नये, यासाठी ठाकरे शिवसेनेच्यावतीने आंदोलनही करण्यात आले होते. मागील वर्षी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धेच्या माध्यमातून भजनी कलेकडे युवकांचा कल वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे, असेही त्यांनी सांगितले.
नीलम सावंत म्हणाल्या, योग्य करिअर निवडण्यासाठी शैक्षणिक वाटचालीतूनच विद्यार्थ्यांचे नियोजन असणे गरजेचे आहे. ध्येयातूनच यश मिळू शकते. यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चिती करूनच शैक्षणिक वाटचाल करावी, असे सांगून त्यांनी सुशांत नाईक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या सत्कार सोहळ्याच्या अभिनव उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
संदीप कदम म्हणाले, शिवसेना – युवासेनेने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. शिवसेना कायमच गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत असते.
यावेळी देवगड तालुक्यातील सुमारे ७० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे वडील भास्कर उर्फ भाई पारकर यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली प्रास्ताविक युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद दुखंडे यांनी केले.
यावेळी माझी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हा प्रमुख यदुठाकूर देसाई, संदीप कदम, युवासेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, महिला तालुका संघटक हर्षा ठाकूर, तालुका प्रमुख रवींद्र जोगल, जयेश नर, युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर, उपतालुका प्रमुख दादा सावंत, माजी सभापती संजय नेरुरकर, विभागप्रमुख संतोष दळवी, विष्णु घाडी, प्रसाद दुखंडे, काका जेठे, गणेश वाळके, सचिन लोके, लक्ष्मण तारी, रमा राणे, गौरव सावंत, जितू जाधव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.