सीताराम उर्फ दाजी सावंत यांनी प्रामाणिकपणे पोलीस खात्याची सेवा केली

सेवानिवृत्तीनिमित एसपी दहिकर यांचे गौरवोद्गार
कणकवली पोलीस ठाण्याच्या वतीनेही करण्यात आला सपत्नीक सत्कार
सीताराम उर्फ दाजी सावंत यांनी महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली. आपले कर्तव्य चोख पार पाडतानाच आपल्या पोलीस दलाच्या सेवकाळात दाजी सावंत यांनी सेवाभावी वृत्तीने अभ्यागताना न्याय दिला. सेवानिवृत्तपर आयुष्यात त्यांनी आपल्या कुटुंबियांना वेळ द्यावा. निरामय निरोगी असे उर्वरीत आयुष्य जगावे अशा सदिच्छा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी दिल्या. कणकवली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सीताराम उर्फ दाजी अंकुश सावंत हे 32 वर्षांच्या शासकीय सेवेतून 30 जून रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनिमित दाजी सावंत यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांच्या हस्ते अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आला. त्यावेळी डॉ दहिकर बोलत होते. यावेळी दाजी सावंत यांची पत्नी नयना, चिरंजीव मिलिंद, मुलगी चारुल उपस्थित होते. दरम्यान पोलीस दलातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या हस्तेही दाजी सावंत यांचा सपत्नीक शाल श्रीफळ, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन कणकवली पोलीस ठाण्यात सत्कार करण्यात आला. कणकवली पोलीस ठाण्यात यावेळी पत्नी नयना, मुलगा मिलिंद, कन्या चारुल, प्रा. विजय सावंत, श्रीराम सावंत, श्रीकांत सावंत, वैभव सावंत, कणकवली पोलीस ठाण्यातील एपीआय डॉ ज्ञानेश्वर सावंत, पीएसआय महेश शेडगे, पीएसआय पवन कांबळे, महिला पीएसआय वृषाली बर्गे, तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक अतुल जाधव म्हणाले की, जसे पोलीस ठाणे प्रभारीपद महत्वाचे असते तसेच पोलीस ठाण्यातील कारकून पद महत्वाचे असते. संपूर्ण पोलीस ठाण्याची जबाबदारी कारकून या पदावर असते. त्यामुळे पोलीस ठाण्यातील कारकून हे पद जेवढे जबाबदारीचे तेवढेच जोखमीचेही असते. सीताराम उर्फ दाजी सावंत यांनी कणकवली पोलीस ठाण्याच्या कारकून पदाची जबाबदारी अत्यंत कर्तव्यदक्षतेने पार पाडली. सिंधुदुर्ग पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदी भरती झाल्यानंतर आपल्या 32 वर्षांच्या पोलीस दलातील सेवकाळात दाजी सावंत यांनी तत्कालीन सावंतवाडी मुख्यालय, कुडाळ पोलीस ठाणे, बांदा पोलीस ठाणे, सावंतवाडी पोलीस ठाणे, कणकवली पोलीस ठाणे येथे सेवा बजावली. अत्यंत क्रियाशील आणि उत्साही स्वभावाच्या दाजी सावंत यांनी नेहमीच पक्षकारांना न्याय देण्याचे काम केल्याची भावना पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले.