प्रॉपर्टीच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणी तिघांना अटकपूर्व जामीन

कणकवली/प्रतिनिधी
कणकवली पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर मारहाणीच्या प्रकरणात संशयित असलेल्या चंद्रशेखर नरे, ज्ञानेश्वर नरे व चंद्रकांत नरे या तिघांना ओरोस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी प्रत्येकी ₹५०,००० चा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या तिन्ही आरोपींच्या वतीने न्यायालयात अॅड. योजना उमेश सावंत यांनी काम पहिले.
आरोपी व फिर्यादी एकाच कुटुंबातील असून, आरोपी सामायिक घरात राहतात तर फिर्यादी व तिचे पती शेजारील नव्या घरात वास्तव्यास आहेत. १३ जून २०२५ रोजी, प्रॉपर्टीच्या वादातून झालेल्या बाचाबाचीत आरोपींनी फिर्यादीच्या पतीला लोखंडी शिगा व लाकडी दांड्यांनी मारहाण करून जीवेमारण्याची धमकी दिली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. फिर्यादीलाही दुखापत झाल्याची तक्रार आहे.
सदर घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींनी अटक होण्याची भीती व्यक्त करून अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. यावर अॅड. योजना सावंत यांनी न्यायालयात युक्तिवाद केला व न्यायालयाने दोन्ही बाजूंचा विचार करून आरोपींना अटी व शर्तींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.