रत्नागिरी सिंधुदुर्ग ची उमेदवारी राणेंना?, कणकवलीतील कार्यालया बाहेर मंडप चे काम सुरू!

उमेदवारी राणे की सामंत अधिकृत नाव गुलदस्त्यात

दोघांकडून देखील उमेदवारी आपल्याच पक्षाला मिळण्याचे दावे

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघावर भाजप व शिवसेनेकडून दावे केले जात आहेत. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव भाजपकडून उमेदवार म्हणून आघाडीवर असतानाच आता कणकवलीत बस स्थानकासमोरील नारायण राणेंच्या संपर्क कार्यालया बाहेर मंडप घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपा कडून राणेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कार्यालयाबाहेर मंडप डेकोरेटर कडून काम सुरू असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि काही भाजप कार्यालयांच्या बाहेर देखील मंडप घालण्याचे काम या मंडप डेकोरेटर ला दिले असल्याचे समजते. त्यामुळे राणेंचे होम पिच असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झालेली ही हालचाल ही भाजपा पर्यायाने राणेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणारी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता ही अधिकृत उमेदवारी केव्हा जाहीर होणार? त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीचे जिल्हा कार्यालय जर या ठिकाणी सुरू होत असेल तर येथील उमेदवार भाजपा च्या कमळ निशाणी चा की शिवसेना धनुष्यबाणाचा उमेदवार असेल ते देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे. परंतु राणेंच्या कार्यालयाबाहेर सुरू झालेल्या मंडप ची हालचाल ही जिल्ह्याच्याच नव्हते या लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!