महामार्गावर हुंबरट तिठा येथे धोकादायक खड्डा

महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीचे होतेय दुर्लक्ष
फोंडाघाट रस्त्यावर होणारी वाहतूक या खड्ड्यातूनच
महामार्गावर हुंबरट तिठा या ठिकाणी सर्विस रस्त्याला पडलेला भला मोठा खड्डा हा सध्या धोकादायक ठरत आहे. सर्विस रस्त्यावर फोंडा रस्त्याकडे वळताना अंडरपास जवळ पडलेला हा खड्डा गेले कित्येक दिवस जैसे थे स्थितीत असून, गेले काही दिवस या खड्ड्यामध्ये वाहने अडकण्याची देखील प्रकार घडत आहे. मात्र महामार्ग प्राधिकरणचे या खड्डयाकडे दुर्लक्ष होत असल्याने तातडीने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांमधून केली जात आहे. महामार्गावर हुंबरट तिठा या ठिकाणी फोंडाघाट रस्त्याने जाणारी अवजड वाहने व फोंडाघाट मार्गावरून होणारी सर्व वाहतूक या हुंबरट येथील अंडरपास मधून होते. हुंबरट अंडरपास जवळ पडलेला जवळपास तीन फुटाचा लांबीचा व एक ते दीड फूट खोल खड्डा हा अंडरपास जवळ वाहने वळतानाच अडचणीचा ठरत आहे. गेल्या वर्षी या खड्डयाच्या अलीकडे काही अंतरावर अशाच प्रकारे पडलेल्या भल्या मोठ्या खड्डयामध्ये अपघात होऊन करूळ येथील एक तरुण ठार झाला होता. मात्र सुशेगात असलेल्या महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीकडून त्यानंतर त्या खड्ड्याची डागडुजी करण्यात आली. आता देखील त्याच जागेवर अशाप्रकारे धोकादायक खड्डा पडला असून अपघात होऊन कुणाचातरी जीव गेल्यानंतर महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीला जाग येणार का? असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे. या खड्डयामध्ये काही महिन्यापूर्वी तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करण्यात आली. मात्र या मार्गावरून सातत्याने होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे खड्डा पुन्हा जैसे थे स्थितीत झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी तातडीने दखल घेत उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.