संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये महिला दिन संपन्न

निलेश जोशी । कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयांमध्ये जागतिक महिला दिन महाविद्यालयाचा महिला विकास कक्ष आणि लायन्स क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये वावरणाऱ्या मान्यवर महिलांचे मार्गदर्शन यानिमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लाभले.
या कार्यक्रमाला सीए जयंती कुलकर्णी, ॲड. नीलांगी रांगणेकर ,पोलिस उपनिरीक्षक रुणाल मुल्ला ,सीए सायली ठाकूर, डॉ. हर्षदा देवधर पत्रकार देवयानी वरसकर, डॉ. दिपाली काजरेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ. एस.टी. आवटे उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये डॉ. हर्षदा देवधर यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. नाजूक म्हणजे सुंदर नव्हे तर आरोग्यपूर्ण कणखरपणा आजच्या युवतीने मिळवला पाहिजे त्यासाठी आपल्या आरोग्याचे रक्षण केले पाहिजे असे सांगितले.
कुडाळच्या पोलीस उपनिरीक्षक रुणाल मुल्ला यांनी विद्यार्थिनींना सायबर गुन्हे आणि त्याविषयी कोणती काळजी घ्यावी यांची माहिती दिली. आपल्या समोरील आव्हानांना नीडरपणे सामोरे जाण्यासाठी मानसिक बौद्धिक आणि शारीरिक सक्षमता मिळवणे आवश्यक आहे. आपण आपल्या हक्कांसाठी जागरूक राहिले पाहिजे असे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी बोलताना ॲड. रांगणेकर यांनी महिलांच्या संदर्भातील कायद्यांची तसेच या क्षेत्रातील महत्त्वाच्या संधीं विषयी सविस्तर माहिती दिली. सीए जयंती कुलकर्णी आणि सायली ठाकूर यांनी या क्षेत्रातील उपलब्ध संधी विषयी माहिती देऊन आपली आतापर्यंतची वाटचाल ही विस्तृतपणे कथन केली. पत्रकार देवयानी वरस्कर यांनी आपल्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनुभव सांगत आज पत्रकारितेच्या क्षेत्रात असलेल्या विविध संधी विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य कॅप्टन डाॅ. एस.टी. आवटे यांनी महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. मान्यवरांनी मांडलेल्या विचारांचे पालन आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी करावे असे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉक्टर शरयू आसोलकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रज्ञा सावंत यांनी केले तर आभार विद्यार्थिनी समृद्धी बोभाटे हिने मानले या कार्यक्रमाला प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी महिला विकास कक्षाच्या वतीने कोकणातील स्त्री जीवन या विषयावर घेण्यात आलेल्या कविता लेखन स्पर्धेतील जागृती सावंत, निनाद राऊळ आणि रिया नाईक या प्रथम तीन क्रमांक प्राप्त विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.