‘सशक्ती’ कार्यक्रमातून महिला उद्योजकांना प्रोत्साहन – नारायण राणे
सिंधुदुर्गनगरीत सशक्ती परिसंवादाला उत्तम प्रतीसाद
मास्टरकार्ड आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशनचा उपक्रम
१९० महिलांना उद्योगासाठी ५५०० चे अनुदान वाटप
प्रतिनिधी। सिंधुदुर्ग : भारतातील महिला उद्योजकांच्या वाढीला गती मिळण्यासाठी .सशक्ती कार्यक्रमाने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सारख्या देशातील ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करणे सुरू ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. मास्टरकार्ड आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशन आर्थिक समावेशन आणि उद्योजकता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.त्यामुळे भारत सरकार आणि एमएसएमई मंत्रालय अशा सहयोगी प्रकल्पाला नेहमीच सहकार्य करेल असेही केंद्रीय मंत्री नारायण राणे पुढे म्हणाले. मास्टरकार्ड पुरस्कृत लर्निंग लिंक्स फाउंडेशन द्वारा संचलित महिला सशक्ती परिसंवाद सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन सभागृहात शनिवारी संपन्न झाला, त्यावेळी श्री. राणे बोलत होते.
मास्टरकार्ड पुरस्कृत लर्निंग लिंक्स फाउंडेशन द्वारा संचलित महिला उद्योजकता कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील निवडक अशा १९० उद्योजक महिलांसाठी या सशक्ती परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १२ महिलांच्या १२ स्टॉल्सचे प्रदर्शन यावेळी येथे मांडण्यात आले होते. त्याचे उदघाटनही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. त्यांनी या स्टॉलसची पाहणी केली आणि नंतर सभागृहात या महिलांना मार्गदर्शन देखील केले. मुख्य कार्यक्रमाचे उदघाटनही श्री. राणे आणि उपस्थित मान्यवर यांच्या दीपप्रज्वलन करून झाले.
लर्निंग लिंक्स फाउंडेशन द्वारा मागील दोन महिन्यांपासून छोटे व्यवसाय करणाऱ्या जिल्ह्यातील १ हजार ३११ महिला उद्योजकांना ट्रेनिंग देण्यात आले. यातील १९० महिलांची निवड करून त्यांना प्रोत्साहन पर ५ हजार ५०० रुपयांचा धनादेश देण्यात आला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नमिता बलवान, ओवी सावंत, पोर्णिमा मसूरकर या तीन महिलांना चेक प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर लर्निंग लिंक फाउंडेशनचे सुदीप दुबे, उपाध्यक्ष असिमा सिंग, झोनल मॅनेजर अपूर्वा शिंदे, मास्टर कार्डचे डायरेक्टर सौरभ सुनील, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश महिला उपाध्यक्ष प्रज्ञा ढवण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, माजी जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, अनेक उद्योगपतींची श्रीमंती पाहून तशी प्रेरणा आपणही घ्यावी. कोणताही यशस्वी उद्योग श्रीमंती आणू शकतो, म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हा उद्योजक जिल्हा घडविण्यासाठी महिलांचाही सहभाग हवा. यासाठी मार्गदर्शन घ्या आपली बुद्धिमत्ता वापरा एक यशस्वी उद्योजक बना, श्रीमंत व्हा आणि माझा सिंधुदुर्ग जिल्हा देशातील श्रीमंत जिल्हा करा असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी केले.
जिल्ह्यातील महिलांनी उद्योग व्यवसाय करावा, त्यांनी आर्थिक श्रीमंत व्हावे, यासाठी या संस्थेने सहकार्यासाठी मार्गदर्शनासाठी पुढाकार घेतला आहे. देशात ही संस्था काम करत असून या जिल्ह्यातही आपल्या महिलांसाठी मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने आपण त्यांना या जिल्ह्यात निमंत्रित केले होते. त्याप्रमाणे ही संस्था या जिल्ह्यात काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तीन कोटी महिलांना लखपती बनविण्याचे जाहीर केले असून महिलांनी उद्योग व्यवसायात म्हणून त्यांनी पाठबळ दिले आहे. अनेक उद्योगपतींची प्रेरणा घेऊन या जिल्ह्यातील महिलांनी उद्योग व्यवसायात पुढाकार घ्यावा, यशस्वी उद्योजक बनवून जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ करावी. हा जिल्हा देशात श्रीमंत जिल्हा म्हणून नावारूपात आणण्यासाठी महिलांचा सहभाग आवश्यक आहे अअसेच नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.
लर्निग लिंक्स फाउंडेशनचे सुदीप दुबे यांनी महिलांना व्यवसायासाठी आर्थिक मदत देण्याचा उद्देश विशद केला. डिजिटल माध्यमातून व्यवसायाच्या अनेक संधी आहेत. सशक्ति ॲपचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावर्षी ४५ हजार महिला या सशक्ति परिसंवादाच्या माध्यमातून या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत तर १७ हजार महिलांना सशक्त बनवण्यात यश आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामुळे येथील महिलांना या महिला परिसंवादाची संधी मिळाली. . महिला उद्योजकाना जोडणे, त्यांना प्रशिक्षण देणे, एक यशस्वी उद्योजक घडविणे यासाठी या जिल्ह्यात आपल्या संस्थेने काम हाती घेतले आहे. यामध्ये महिलांनीही चागला प्रतिसाद दिल्या बद्दल दुबे यांनी आभार मानले.
लाभार्थी महिलांमधून बोलताना साळगाव येथील मधुरा धुरी यांनी महिलांना व्यवसायाच्या अधिक संधी असून त्या ओळखता आल्या पाहिजेत तरच प्रगती होईल असे स्पष्ट केले. तर जीवदानी माणगावकर यांनी व्यवसायातील नावीन्य शोधत प्रवास मजबूत आणि अखंड ठेवा मदतीचे हात आपोआप येतील असा विश्वास दिला.
दरम्यान मुख्य कार्यक्रमापूर्वी झोनल मॅनेजर अपूर्वा शिंदे यांच्याशी संवाद साधताना उपस्थित महिलांनी मार्केटिंगची अडचण व्यक्त केली. ककुकूटपालन, खानावळ, बेकरी, शेळीपालन पार्लर, सरबत, मसाले, विद्यार्थी क्लास,कॅटरिंग, अगरबत्ती व मेणबत्ती, काथ्या उदयोग, कृषी सेवा केंद्र, भाजीपाला, लाकडी वस्तू, गांडूळ खत, पापड, टेलरिंग, ज्वेलरी, आदी व्यसयाय करणाऱ्या महिलांनी आपली ओळख व आपल्या उद्योगांची ओळख करून दिली. काही व्यवसाय कल्पक व नवनिर्मीत असून नावीन्यपूर्ण असल्याने सर्वांनीच चांगली दाद दिली. या कार्यक्रमाला सुप्रिया वालावलकर, प्रज्ञा ढवण, साक्षी कोचरेकर, भक्ती पळसमकर, साधना माडये आदी मान्यवर उपस्थित होत्या.
लर्निंग लिंक्स फाऊंडेशनच्या झोनल मॅनेजर अपूर्वा शिंदे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नेतृत्व केले. त्याच बॊर्बर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिंधुदुर्ग टीमच्या दिप्ती मोरे, राजरतन दुपारे, प्रशांत कवटे, शेखर कांबळे, जयराम जाधव यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन निलेश जोशी यांनी केले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.