सिंधुसागरापासून सह्याद्रीपर्यंत पर्यटन विस्तारणार
सिंधुदुर्ग व्यापारी पर्यटन समितीच्या पहिल्याच बैठकीत निश्चय
जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
मोटारसायकल रॅलीने सह्याद्री भागातील पर्यटनाला देणार चालना
निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ संचलित सिंधुदुर्ग व्यापारी पर्यटन समितीची पहिली बैठक राजन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथे मराठा हॉलमध्ये पार पडली. या बैठकीला व्यापारी महासंघ व पर्यटन समितीच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या बैठकीमध्ये पर्यटन समितीची ध्येय्यधोरणे व घटना ठरविण्यात आली. ज्यामध्ये प्रामुख्याने सिंधुसागरा पासून सह्याद्री पर्यंत पर्यटन उद्योग विस्तारण्यासाठी व्यापारी पर्यटन समिती काम करणार आहे.
या व्यापारी पर्यटन समितीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरीच वर्ष रखडलेला सीवर्ल्ड हा प्रकल्प लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने शासन दरबारी विशेष प्रयत्न करणार आहे, त्याचप्रमाणे अँग्रिया बँक हे समुद्रामध्ये असलेले आयलँड पर्यटकांसाठी खुले व्हावे यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र शासनाने पर्यटन उद्योगाच्या वाढीसाठी सर्विस इंडस्ट्रीजला औद्योगिक दर्जा देण्याचे यापूर्वीच जीआर काढून जाहीर केले आहे, परंतु सर्विस इंडस्ट्रीजला म्हणजेच हॉटेल्स रिसॉर्ट मोटेल्स यासह सर्विस ईंडस्ट्रीजमध्ये मोडणारे सर्व उद्योग यांना औद्योगिक दर्जा मिळून सुद्धा विजेचे दर हे कमर्शियल दरानेच लावले जात आहेत ते औद्योगिक दराने लावले जावेत यासाठी पर्यटन समिती शासन दरबारी विशेष प्रयत्न करणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूर्वेकडील म्हणजेच सह्याद्रीच्या कुशीत वसलेला भाग हा सृष्टीसौंदर्याने नटलेला असूनही तो अद्याप पर्यंत पर्यटकांपासून वंचित राहिलेला आहे हा सर्व परिसर सिंधुदुर्गवासियांबरोबरच पर्यटकांच्या नजरेखाली यावा या हेतूने एप्रिलमध्ये एका मोटर सायकल रॅलीचे आयोजन या पर्यटन समितीतर्फे करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या मोटारसायकल रॅलीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्र गोवा व कर्नाटक राज्यातील मोटारसायकलस्वार मोठ्या संख्येने सहभागी होतील यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
त्याचप्रमाणे साहसी क्रीडा प्रकार, क्रॉस व्हॅली, रॅपलिंग, विविध दुर्लक्षित राहिलेले धबधबे, पावसाळी पर्यटन या विविध विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, सेक्रेटरी नितीन वाळके, पर्यटन समितीचे अध्यक्ष राजन नाईक, टोलमुक्ती संघटनेचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, कुडाळ तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संतोष काकडे, व्यापारी पर्यटन समितीचे सचिव विलास कोरगावकर, नंदन वेंगुर्लेकर, गजानन कांदळगावकर, प्रथमेश सामंत, मनोज वालावलकर, जितेंद्र पंडीत, विवेक नेवाळकर, प्रमोद नलावडे, अभि वेंगुर्लेकर, मोहनीश कुडाळकर,दिग्विजय कोळंबकर, संदेश गोसावी यांच्यासह पर्यटन समितीचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.