आमदार वैभव नाईक, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या भेटीने सिंधुदुर्गाच्या राजकीय वर्तुळात खळबळ

कणकवलीत बंद दाराआड झाली काही वेळ चर्चा

कारण विकास कामांचे, चर्चा मात्र भाजपा प्रवेशाची

राज्याच्या राजकारणात पक्षांतराच्या अनेक राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आता या घडामोडींचे पडसाद उमटू लागले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवणचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची गुरुवारी दुपारी कणकवलीतील शासकीय विश्रामगृहावर बंद दाराआड चर्चा झाली. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्यानंतर काही तासातच ही भेट झाली. या भेटीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, आमदार वैभव नाईक यांनी देखील या भेटीला दुजोरा दिला असला तरी विकास कामाच्या अनुषंगाने भेट झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र आतापर्यंत राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी पाहता भाजपा नेत्यांच्या संपर्कात गेलेले बहुतांशी विरोधी पक्षातील नेते, आमदार खासदार हे महायुतीत सामील झाल्याचे चित्र असल्याने या भेटीकडे एका वेगळ्या घडामोडीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे भाजपा मध्ये असल्याने आमदार वैभव नाईक हे भाजपमध्ये जाणार नाहीत अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र राजकारणात केव्हाही काही घडू शकते हे अलिखित संकेत पाहिले असता आमदार वैभव नाईक यांच्याकडून विकास कामांबाबत दिले जात असलेले भेटीचे कारण हे येत्या काळात कितपत खरे हे देखील लवकर स्पष्ट होणार आहे. दरम्यान आमदार वैभव नाईक यांच्या भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या कोणत्याही नेत्याकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नसली, तरी आमदार वैभव नाईक यांची भेट ही भाजपा व ठाकरे गट दोन्ही बाजूने वातावरण टाइट करणारी ठरली आहे. आमदार वैभव नाईक हे कदाचित भाजपमध्ये गेले तर या मतदारसंघात आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या माजी खासदार निलेश राणे यांचे काय हा देखील प्रश्न अनुत्तरीत राहत आहे. तसे घडल्यास भाजपा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा करत असताना भाजपाकडून वेगळ्या पर्यायांची चाचपणी देखील केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण व आमदार वैभव नाईक यांच्या भेटीचे खरे कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात उलट सुलट घडामोडी घडण्याची संकेत या भेटीमुळे मिळत आहेत.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

Image
error: Content is protected !!