प्रशिक्षीत ८७ मच्छिमार सिंधुपुत्रांना वॉटर स्पोर्टस परवाने

१० सिंधूकन्यांनी पूर्ण केले वॉटर स्पोर्ट्सचे प्रशिक्षण

मान्यवरांच्या उपस्थितीत होणार परवान्यांचे दिमाखात वितरण

मानव साधन विकास संस्थेचा अभिनव उपक्रम

निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, मालवण, देवगड हे तालुके वॉटर स्पोर्टस् व्यवसायासाठी पोषक आहेत. सहकारातून वॉटर स्पोर्टस क्षेत्रात रोजगार निर्मिती सहज शक्य आहे हे ओळखून मानव साधन विकास संस्थेमार्फत वॉटर स्पोर्ट्सचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना लवकरच एका शानदार सोहळ्यात प्रमाणपत्र व वॉटर स्पोर्टस परवाना वितरण करण्यात येणार आहे. एकूण ८७ जणांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यात १० युवतींचा देखील समावेश आहे.
वेंगुर्ले तालुक्यात आरवली-सागरतिर्थ येथील ‘आराकिला’ या पंचतारांकित रिसॉर्टवर राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, नाबार्डचे अध्यक्ष शाजी के.व्ही., आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशनचे अध्यक्ष संजय दत्ता, सी.आय.आय.चे डॉ. राजेश कपुर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू संस्थापक अध्यक्ष असलेली मानव साधन विकास संस्था ही कोकणातील एक नामांकित सामाजिक संस्था. सध्या अध्यक्ष सौ. उमा प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजोपयोगी उपक्रमांचा फायदा या संस्थेमार्फत आतापर्यंत कोकणातील लाखो लाभार्थ्यांना मिळाला आहे.
गेल्या २५ वर्षांत मानव साधन विकास संस्थेने सिंधुदूर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांतील ९०,००० हून जास्त गरजूंना ‘जन शिक्षण संस्थान’ (देशातील पहिले ग्रामीण जनशिक्षण संस्था), ‘उद्योजकता विकास संस्था’ ( नवी मुंबईतील वंचित कामगारांच्या पाल्यांकरीता), ‘स्कूल ऑफ नर्सिंग’ (सिंधुदुर्ग मधील पहिले नर्सिंग स्कूल), ‘परिवर्तन केंद्र’ प्रकल्प, इत्यादींच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत प्रशिक्षित केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेष उदाहरण म्हणजे संस्थेमार्फत १२ वर्षांपूर्वी दिलेल्या वॉटर स्पोर्टस् प्रशिक्षणाचा फायदा करून घेत आज मालवण (सिंधुदूर्ग) तालुक्यातील मच्छिमार युवक पर्यटन क्षेत्रात यशस्वीपणे उद्योग करीत आहेत, त्यातूनच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हजारो स्थानिकांना उद्योग व रोजगार निर्माण झाला आहे.


मानव साधन विकास संस्था ही महिला, शेतकरी, मच्छिमार, युवा, माजी सैनिक व आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. कोकण किनारपट्टीचे सतत वृद्धिंगत होणारे पर्यटनमुल्य लक्षात घेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार युवकांसाठी मानव साधन विकास संस्था संचलित, परिवर्तन केंद्र प्रकल्प, सिंधुदूर्ग आणि ‘आय.सीआय.सी.आय. फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिंधुपुत्र’ हा उपजिविका निर्मितीक्षम कार्यक्रम ऑक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ या दरम्यान राबविण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत ‘लाईफ सेव्हिंग तंत्र, वॉटर स्पोर्टस् व पॉवर बोट हॅन्डलिंग’ याचे निवडक ८७ मच्छिमार युवक व युवतींना प्रशिक्षण देण्यात आले.
हे प्रशिक्षण भारतातील नामांकित ‘भारतीय पर्यटन आणि यात्रा प्रबंध संस्थान’ अंतर्गत ‘राष्ट्रीय जलक्रीडा संस्थान-गोवा’ या पर्यटन मंत्रालय, भारत सरकार अधिकृत संस्थेमध्ये देण्यात आले. विशेष बाब म्हणजे प्रथमच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १० सिंधुकन्यांनी सदरचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र व बॉटर स्पोर्टस परवाना वितरणाच्या दिमाखदार सोहळ्याचे लबकरच आयोजन करण्यात येणार आहे. .

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!