थ्रीप्स रोगाने आंबा बागायतदार संकटात

औषध कंपन्यांकडून थ्रीप्स फवारणीच्या नावाखाली आर्थिक लूट
5 हजार लिटर दराने औषध विक्री
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती
आंबा उत्पादनाला सध्या थ्रीप्स रोगाने ग्रासले असून आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर ऐन आंबा हंगामात मोठे संकट आले आहे. या थ्रीप्स रोगावर कीटकनाशक फवारणी च्या नावाखाली औषध कंपन्यांकडून आंबा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करून आर्थिक लूट सुरू असून याविरोधात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे लक्ष वेधणार असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी देवगड युवासेना तालुकाप्रमुख फरीद काझी, गणेश गावकर, बुवा तारी आदी उपस्थित होते. सुशांत नाईक म्हणाले की ऐन आंबा उत्पादन हंगामात थ्रीप्स रोगाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया जाणार आहे. मार्च ते एप्रिल दरम्यान मिळणारे हंगामातील शेवटचे पीक वाया जाणार आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे.औषध कंपन्यांकडून थ्रीप्स रोगावर इलाज म्हणून 4 ते 5 हजार रुपये दराने 1 लिटर औषध विक्री केली जात आहे. मात्र या औषधाने थ्रीप्स रोगावर आळा येतो अशी गॅरंटी नाही.कृषी विद्यापीठाने सुद्धा थ्रीप्स रोगावर कुठलेही कीटकनाशक औषध अद्याप जाहीर केले नाही. तरीही औषध कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांची आर्थिक लूट सुरू आहे. थ्रीप्स कीटकनाशक एकदा फवारणी केल्यानंतर पुन्हा 4 ते 7 दिवसांच्या फरकाने ही फवारणी करावी असे औषध कंपन्यांचे म्हणणे आहे.म्हणजे एकीकडे फवारणी चा उपयोग होत नाहीत तर दुसरीकडे फवारणी साठी लागणारी मजुरी आणि वेळ दुप्पट मोजावा लागत आहे.काही औषध विक्रेते तर स्वतःच हे कीटकनाशक पॅक करून विक्री करत आहेत. ही आंबा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणुक आहे. याविरोधात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे तक्रार करून अशा कंपन्या आणि औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही नाईक म्हणाले.





