प्राचीन वारसा जतनाबाबत विद्यार्थीदशेतच

जागृती करणे आवश्यक : सतीश लळीत

निलंगा येथील राष्ट्रीय परिषदेत प्रतिपादन

सिंधुदुर्ग : ऐतिहासिक वारसा जपणे हे प्रत्येकाचे वैयक्तिक आणि समाजाचे सामूहिक कर्तव्य आहे. भावी पिढ्यांसाठी हा वारसा जपून त्याचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थीवयातच जागृती निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी निलंगा येथे नुकतेच केले.

लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय पुरातत्व परिषद नुकतीच झाली. या परिषदेत श्री. लळीत यांना साधनव्यक्ती म्हणून निमंत्रित करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी ‘कोकणातील कातळशिल्पे आणि त्यातील काही संकल्पना’ या विषयावर सविस्तर सादरीकरणही केले.

या परिषदेचे उद्घाटन भारतीय इतिहास संशोधन परिषद, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर यांच्याहस्ते झाले. महाराष्ट्र महाविद्यालय, इतिहास विभाग व भारतीय सामाजिक शास्त्रे संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ही दोन दिवशीय राष्ट्रीयपरिषद आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पोळ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, परिषदेचे संयोजन सचिव डॉ. सुभाष बेंजलवार उपस्थित होते.

संशोधन हा शिक्षणाचा एक भाग आहे. दुसऱ्यात योग्यता निर्माण करणे म्हणजे शिक्षण. अशा प्रकारचे संशोधन होताना परंपरा, प्रतिमा यातील विज्ञान समजून घेतले तरच मूर्तीचा अभ्यास करता येईल, असे मत  डॉ. जामखेडकर यांनी यावेळी व्यक्त केले.

 डॉ जामखेडकर म्हणाले, नाणे ही प्रतिमा वा मुद्रा आहे; पण ते ज्याच्या हातात पडेल, तो त्याचा वेगवेगळा अर्थ लावून वापर करतो. त्याने लावलेला हा वेगवेगळा अर्थ समजून घेऊनच संशोधन केले पाहिजे. उत्तर भारताच्या संदर्भात मूर्ती, शिल्प, लेणी, स्तूप, चैत्यगृह याबाबतीत भरपूर ऐतिहासिक मांडणी झालेली आहे. दक्षिण भारताच्या बाबतीत अशी मांडणी झाल्याचे प्रमाण फार कमी आहे, ते डोळ्यासमोर ठेवून या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.

श्री. लळीत यांनी सादरीकरणात कोकणातील कातळशिल्पांची संकल्पना स्पष्ट करुन सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, पुरातत्वशास्त्रामध्ये सर्वेक्षण, संशोधन, उत्खनन आणि अर्थान्वयन याला खुप महत्त्व आहे. कोकणातील कातळशिल्पांचे अर्थान्वयन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. युनेस्कोने कोकणातील आठ गोव्यातील एक अशा नऊ कातळशिल्पांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या प्राथमिक यादीत समावेश करुन याच्या प्राचीनत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र या प्राचीन वारशाचे जतन हा आज कळीचा मुद्दा ठरला आहे. याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. आपल्या सादरीकरणात श्री. लळीत यांनी कातळशिल्पांच्या काही प्रतिमांमध्ये आढळलेल्या मातृदेवता संकल्पनेचा मागोवा घेतला.

 यावेळी श्री. निलंगेकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. राहुल वरवंटीकर, मूर्तीकलेचे अभ्यासक डॉ. अरविंद सोनटक्के यांची भाषणे झाली. 

प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी परिषदेसाठी आलेल्या प्रमुख उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे संयोजन सचिव डॉ. सुभाष बेंजलवार यांनी केले. आभार डॉ. भास्कर गायकवाड यांनी मानले.

या परिषदेत दीडशेहून अधिक संशोधक, विद्यार्थी सहभागी झाले होते. एकंदर चार सत्रांमध्ये संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. निलंगा येथील प्रसिद्ध निळकंठेश्वर मंदिर आणि खरोसा लेणी येथे अभ्यास सहलही आयोजित करण्यात आली होती.
00000

फोटो ओळी
निलंगा येथील राष्ट्रीय पुरातत्व परिषदेवेळी सतीश लळीत यांनी आपले ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ हे पुस्तक महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांना भेट दिले. यावेळी प्रा.डॉ. सुर्यकांत वाकळे यांनी श्री. लळीत यांचे स्वागत केले.

error: Content is protected !!