कुडाळ शहरात टाकला जातोय अन्य भागातून कचरा !
कचरा साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होतोय नाहक त्रास
कुडाळ : शहरात कचरा गोळा करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीकडून ‘घंटागाडी’ प्रत्येक वॉर्डमध्ये फिरवली जाते. या घंटागाडीत अगदी सकाळपासून सफाई कर्मचाऱ्यांकडून कचरा गोळा केला जातो. सुका कचरा आणि ओला कचरा असे वर्गीकरण करून तो अखेर डम्पिंग मैदानावर नेवून त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जाते. यामुळे कुडाळ शहरात बऱ्यापैकी स्वच्छता दिसून येते.
परंतु, सध्या कुडाळ शहरातील एमआयडीसी तसेच गुलमोहोर हॉटेल, क्षितिज अपार्टमेंटनजीकच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात असल्याचे दिसून येत आहे. कुडाळ शहराच्या बाहेरून काही नागरिक रात्रीच्या वेळी मोठ्या बॅग, गोणपाट यामध्ये कचरा भरून तो फेकत असल्याची माहिती समोर आली आहे. हा कचरा गुलमोहोर हॉटेल आणि क्षितिज अपार्टमेंटनजीकच्या ओढ्यात सुद्धा फेकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या ओढ्यातील कचरा काढण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना मोठे कष्ट घ्यावे लागतात. या भागात एकंदरीत कुडाळ नगरपंचायत प्रशासनाने शहर स्वच्छ आणि आरोग्य सुदृढ राहण्यासाठी ‘घंटागाडी’ संकल्पना राबविली. परंतु, बाहेरच्या भागातून येणाऱ्या नागरिकांकडून कुडाळ शहरात कचरा टाकला जात असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. कुडाळ शहरात बाहेरील भागातून कचरा टाकणारी व्यक्ती आढळल्यास त्याचा फोटो काढून नगरपंचायत प्रशासनाला कळवावे, असे आवाहन प्रशासनने केले आहे.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ