२२ जानेवारीचा रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन “मर्यादा पुरुषोत्तम दिन” घोषित करा.

हिंदू महासभेची राज्यपाल यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : राष्ट्रपती महोदया महामहीम द्रौपदीजीं मुर्मूंनी २२ जाने. हा रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन ” मर्यादा पुरुषोत्तम दिन ” घोषित करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी विनंती हिंदू महासभेने केली आहे. हिंदू महासभेचे प्रतिनिधी .राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन देण्यासाठी गेले असता, त्यांची भेट राजभवनावर होऊ शकली नाही. पण हिंदू महासभेच्या वतीने राजभवनावर हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे, हिंदू महासभेच्यावतीने, तत्कालीन फैजाबाद जिल्हाध्यक्ष स्व. ठाकुर गोपालसिंह विशारदजीनीं रामलल्लाच्या दर्शन, पुजेचा अधिकार मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयात (३/१९५० ) वादपत्र प्रस्तुत करुन न्यायालयीन लढा सुरु केला होता. रामजन्मभूमीची विवादीत २:७७ अेकर जमीन हिंदू महासभा, निर्मोही आखाडा आणि वक्फ बोर्डला समान विभागून देण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या दिनांक ३० सप्टे. २०१० च्या निर्णया विरोधात हिंदू महासभेने न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या रामलल्ला विराजमानच्या बाजूने दिलेल्या निर्णयामुळे, हिंदू महासभेने लढलेल्या प्रदीर्घ लढ्याची इतिश्री झाली आहे. या निर्णयामुळे विवादीत रामजन्मभूमी अखंड हिंदूकडे आली आहे. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेक्षणी शतकांपासुनचा संघर्ष समाप्त होऊन, समस्त हिंदूना रामलल्लाच्या दर्शनाचा, पुजेचा मुक्त अधिकार प्राप्त होणार आहे.
हिंदू महासभेची धारणा आहे की, हा दिवस राष्ट्रीय दृष्टीने खुप महत्वाचा आणि विलक्षण आहे. रामलल्ला हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक आहेत. श्रीराम हिंदूचे उच्च श्रद्धेयस्थान आहे, समस्त हिंदू त्यांना मर्यादा पुरुषोत्तम मानतात. समस्त हिंदूच्या या धारणेस अनुसरुन, हिंदू जनभावनांचा आदर राखण्यासाठी आणि २२ जानेवारीचा राममंदिराच्या गर्भगृहातील, विलक्षण, अद्भुत, आनंदमयी, मंगलमय रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा निरंतर अविस्मरणीय रहावा, यासाठी हा दिवस ” मर्यादा पुरुषोत्तम दिन ” केंद्र शासनाने घोषित करावा, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेच्यावतीने निवेदनात करण्यात आली आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!